पुरुष मंडळींनी झाडाचे बुंधे तोडून रस्त्यात आडवे टाकले होते. ७०-८० जणांचा गट असेल. आदल्या रात्री भेटून त्यांनी भेलोनीलोध ते ललितपूर (दक्षिणेकडे अंदाजे ४० किमीवर) आणि झाशीपर्यंत (उत्तरेकडे अंदाजे ९० किमी) अशा खड्ड्यांनी भरलेल्या, धुऊन गेलेल्या दोन रस्त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं नियोजन केलं. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधल्या या गावातल्या लोकांनी या आधीही पत्रव्यवहार, सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं हे सोपस्कार पार पाडले होते – रास्ता रोको करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
आदल्या दिवशी संध्याकाळी, २५ वर्षीय राजबेती वंशकारला इतर बायांकडून या आंदोलनाविषयी समजलं होतं. पूर्ण सकाळभर आंदोलनाच्या आवाजांकडे तिचे कान लागलेले होते, पण तिला फार काही ऐकू आलं नाही. १,९०० लोकसंख्येच्या या गावात राहणारी राजबेती बासोर या अनुसूचित जातीची आहे. तिचं घर गावातल्या लोधी या मागासवर्गीयांच्या वस्तीपासून थोड्याच अंतरावर आहे. १२ वर्षांपूर्वी ती सिद्धार्थनगर जिल्ह्यातल्या जामला जोत गावाहून भेलोनीलोधमध्ये रहायला आली. ती बांबूच्या टोपल्या विणून विकते आणि घराच्या कमाईला अंदाजे १००० रुपयांचा हातभार लावते.
त्या दिवशी, तिचा आठ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी शाळेत गेली, नवरा कामावर गेला आणि मग तिच्या कानावर काही तरी आवाज यायला लागले. “११-१२ वाजण्याच्या सुमारास मला झिंदाबादचे नारे आणि विजयी झाल्याच्या घोषणा ऐकू यायला लागल्या. नंतर दुपारी माझी हातपंपावर इतर बायांशी भेट झाली तेव्हा ताई [मीरा देवी] कडून मला काय घडलं ते कळलं. उपदंडाधिकारी साहिबा आहेत त्यांनी दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचं वचन दिलंय,” राजबेती वंशकार सांगते.







