तीस वर्षांपासून देवू भोरे रस्सी वळतायत. जास्त चिवट धाग्यांपासून कच्चं सूत बाजूला करायचं. घरातल्या आढ्याला अडकवलेल्या आकड्याच्या मदतीने चिवट धागे नऊ फुटांपर्यंत ताणायचे आणि त्यांचे बिंडे बांधायचे. प्रत्येक बिंड्याचं वजन १.५-२ किलो भरतं. आठवड्यातले तीन दिवस सात सात तास करून असे १० बिंडे गुंडाळले जातात.
या पिढीजात धंद्यामध्ये सुताचा प्रवेश इतक्यातच झालाय. पूर्वापारपासून त्यांनी घायपातीपासून धागे काढले आहेत. पण त्या कामातून भागेनासं झालं तेव्हा त्यांनी सूत वापरायला सुरुवात केली. आणि आता बाजारात नायलॉनची चलती असल्यामुळे त्यालाही उतरती कळा आली आहे.
देवू लहान होते तेव्हा त्यांचे वडील महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरच्या १० किलोमीटरवरच्या जंगलांमध्ये चालत जायचे आणि घायपात घेऊन यायचे. इथल्या भागात त्याला फड म्हणतात. ते अंदाजे १५ किलो माल घेऊन यायचे. घायपातीचे काटे काढून टाकले की आठवडाभर ती घायपात पाण्यात भिजू घालायची आणि नंतर दोन दिवस सुकायला ठेवायची. या सगळ्यातून रस्स्या वळण्यासाठी दोन किलो तंतू मिळायचा. देवूंची आई, मैनाबाई देखील हे काम करायच्या आणि १० वर्षांचे देवू त्यांना मदत करायचे.
१९९० च्या सुरुवातीला भोरे कुटुंबियांनी घायपातीच्या ऐवजी सूत वापरायला सुरुवात केली – त्याच्या रस्स्या जास्त काळ टिकायच्या. शिवाय, देवू सांगतात, “लोकांनी जंगलं तोडल्यात. आणि फडापरीस सूत वापरणं सोयीचं आहे [घायपात भिजू घालायच्या, सुकवायच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो].”
१९९० पर्यंत त्यांच्या गावातली जवळ जवळ १०० कुटुंबं रस्स्या वळत असावीत असा देवूंचा अंदाज आहे. ते बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातल्या बोरगावमध्ये राहतात. बाजारात स्वस्तातले नायलॉनचे दोर आले आणि कमाई घटू लागली तेव्हा अनेक जणांनी आसपासच्या गावांमध्ये शेतातली कामं करायला सुरुवात केली किंवा जवळच्या इचलकरंजी किंवा कागल शहरातल्या यंत्रमाग कारखान्यात किंवा स्पेअर पार्टच्या कारखान्यात कामं धरली.















