हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
बाजाराला, बाजारात...
ज्यांनी आणले त्या बायांच्या उंचीपेक्षा हे बांबू किमान तिपटीने लांब असतील. झारखंडच्या गोड्डामध्ये प्रत्येकीने किमान एक किंवा जास्त बांबू आठवडी बाजारात विकायला आणलाय. काही जणी तर १२ किलोमीटर चालत आल्यात, तेही डोक्यावर किंवा खांद्यावर बांबू तोलत. आणि अर्थातच त्या आधी जंगलात जाऊन बांबू तोडून आणायचं कामही त्यांनीच केलंय.
इतक्या सगळ्या मेहनतीनंतर दिवसाच्या शेवटी त्यांची २० रुपयाची जरी कमाई झाली तरी खूप. गोड्डातल्या दुसऱ्या एखाद्या बाजारात चक्कर टाकली तर दिसेल की काही जणी इतकंही कमवू शकल्या नाहीयेत. डोक्यावर पानांची चळत घेऊन येणाऱ्या या बायांनी ती पानं गोळा करून त्याच्या पत्रावळी शिवल्यायत. त्यांच्यासारख्या उत्तम टाकाऊ ताटल्या नाहीत. चहाची दुकानं, खानावळी आणि उपहारगृहात या शेकड्याने घेतल्या जातात. त्यातून बायांना जेमतेम १५-२० रुपये मिळत असतील. पुढच्या वेळी रेल्वे स्थानकावर जेव्हा अशा पत्रावळीत काही खाल, तेव्हा या तिथपर्यंत कशा पोचल्या ते तुमच्या आता लक्षात येईल.
या सगळ्याच बायांना लांब अंतर कापून घरी परतायचंय आणि घरीदेखील त्यांच्यावर कमी जबाबदाऱ्या नाहीयेत. बाजाराचा दिवस म्हणजे अगदी लगबगीचा दिवस. बाजार आठवड्यातून एकदाच भरतो. त्यामुळे या छोट्या उत्पादक आणि विक्रेत्यांनी आज जे कमवलंय ते पुढचे सात दिवस त्यांना पुरवून वापरायला लागतं. पण त्यांच्यावर इतरही काही दबाव आहेतच. बऱ्याच वेळा गावाच्या वेशीवर त्यांना सावकार गाठतात आणि दमदाटी करून त्यांचा माल अगदी कवडीमोलाने विकत घेतात. काही जणी याला बळीही पडतात.
काही जणींनी तर पैसे देणाऱ्याशी वायदे केलेले असतात. अनेकदा व्यापाऱ्याच्या दुकानापाशी अशा काही जणी थांबलेल्या दिसतात. ओरिसाच्या रायगडामधल्या एका दुकानापाशी बसून राहिलेल्या या आदिवासी बाईची कहाणी तीच असावी. दुकान मालकासाठी ती थांबलेली दिसतीये. तिला तास न् तास ताटकळत बसावं लागू शकतं. गावाच्या वेशीजवळ याच आदिवासी समूहातले किती तरी जण बाजाराला जायला निघाले आहेत. बहुतेक जण व्यापाऱ्याला देणं लागतात, त्यामुळे ते फारसा काही भाव करू शकत नाहीत.
बाजारात माल विकायला येणाऱ्या बायांना सगळीकडेच दादागिरी आणि लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. आणि इथे फक्त पोलिस नाहीत, त्यांच्या जोडीला वनरक्षकही असतात.
आजच्या बाजाराने मलकानगिरीच्या बोंडा समूहाच्या स्त्रियांची तशी निराशाच केलीये. तरीही त्या सामानाने भरलेली मोठी संदूक बसच्या टपावर सराईतपणे लादतात. त्यांच्या गावापासून सर्वात जवळचा बसचा थांबाही बराच लांब असल्याने नंतर त्यांनाच तो बोजा वागवत बरंच अंतर पायीच जावं लागणार आहे.
झारखंडच्या पलामूतल्या बाजाराला निघालेली ही बाई. सोबत तिचं लेकरु, तिचे बांबू आणि थोडी शिदोरी. दुसऱ्या बाळाचंही लवकरच आगमन होणारसं दिसतंय.
लघु उत्पादक किंवा विक्रेती म्हणून देशभरातल्या लाखो स्त्रिया जे कमवतात ते एकेका कुटुंबाच्या पातळीवर फार छोटं आहे. पण त्यांच्या कुटुंबाच्या जिविकेसाठी मात्र ते फार मोलाचं आणि महत्त्वाचं आहे.
आंध्र प्रदेशातल्या विजयानगरममधली ही कोंबडी कापून चिकन विकणारी मुलगी केवळ तेरा वर्षांची आहे. त्याच बाजारात भाजी विकणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्याच वयाची. त्यांच्याच वयाचे त्यांचे भाऊ मात्र शाळेत जात असण्याची शक्यता जास्त आहे. बाजारात जाऊन माल विकण्यासोबत याच मुलींना बायांचंच मानलं गेलेलं भरपूर घरकामही करावं लागतं ते वेगळंच.