फेब्रुवारी, २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात मी इटुकुलकोटाला गेलो होतो तेव्हा पोडियम बापीराजू आणि त्यांच्या घरचे ताडपत्रीच्या तंबूत राहत होते. १० ऑक्टोबर २०१७ रोजी पोलावरम मंडलमधल्या त्यांच्या गावात पूर आला आणि त्यांच्या माती आणि विटांच्या चार खोल्यांच्या घराचा काही भाग ढासळला.
“आमची भांडीकुंडी, कोंबड्या, बकऱ्या [आणि इतर माल] असं सगळं मिळून १०,००० रुपयांचं नुकसान झालं,” कोया आदिवासी शेतकरी असणारे ४५ वर्षीय बापीराजू सांगतात. इटुकुलकोटा हे आदिवासी बहुल गाव आहे आणि इथे कोया आदिवासींची सुमारे १८० घरं आहेत. बापीराजू दोन एकर पोडू म्हणजेच वनजमीन आणि एकरी १०,००० रु. वार्षिक भाडेपट्टयावर आणखी तीन एकर जमीन कसतात. “मी या पाच एकरात उडीद करतो. पुरात सगळं पीक वाहून गेलं आणि जुलैत मी या रानात गुंतवलेले ७०,००० देखील पाण्यात गेले.”
तंबूच्या ताडपत्रीला अडीच हजार खर्च आला, बापीराजूंनी आसपासच्या रानात काम करून पैसे साठवून सहा किलोमीटरवरच्या पोलावरम शहरातून ती विकत आणलीये. एक महिनाभर त्यांच्या घरचे उघड्यावरच होते, पडझड झालेल्या घराजवळच चूल मांडून तिथेच जवळ निजत होते. हिवाळ्याचे दिवस आणि उघड्यावर प्रचंड गारठा होता. त्यांचे शेजारी – ज्यांची पक्की सिमेंट-कॉंक्रीटची घरं पुरात शाबूत राहिली होती – त्यांना खाणं आणि पांघरायला देत होते.
मी एप्रिलच्या मध्यावर परत इटुकुलकोटाला गेलो तेव्हा हे कुटुंब - बापीराजू, त्यांची पत्नी, २२ वर्षांचा मुलगा मुत्याला राव, सून आणि १९ वर्षांची मुलगी प्रसन्ना अंजली – अजूनही तंबूतच राहत होतं. तात्पुरतं एक स्वयंपाकघर बनवलं होतं आणि उघड्यावरच अंघोळीची सोय केली होती. डिसेंबरमध्ये स्थानिक कामगार युनियनने सिमेंटचे पत्रे टाकून तंबूपाशी आडोसा केला होता आणि आता हे कुटुंब त्या दोन्हीचा वापर निवाऱ्यासाठी करत होतं.
त्यांच्यासारखीच इतर १६ कोया कुटुंबं होती – गावकऱ्यांच्या आणि माझ्या गणतीनुसार – ज्यांची घरं पुरात वाहून गेली होती.









