भंवरी देवीच्या १३ वर्षांच्या मुलीवर वरच्या जातीच्या एका तरुणाने बाजरीच्या रानात बलात्कार केला तेव्हा भंवरी देवीने एक लाठी उचलली आणि त्या बलात्कारी मुलाच्या अंगावर ती धावून गेली. पोलिस आणि न्यायालय या दोन्हीवर तिचा काडीचा विश्वास नव्हता. तसंही अहिरों का रामपुराच्या उच्चजातीयांनी तिला न्याय मिळवण्यापासून रोखलंच होतं. “गावाच्या जात पंचायतीने मला न्याय मिळवून देण्याचं कबूल केलं होतं,” ती सांगते. “पण केलं काय, त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला रामपुरातून हाकलून लावलं.” बलात्काराच्या त्या घटनेला दहा वर्षं उलटून गेली, पण अजमेर जिल्ह्यातल्या या गावातल्या कुणालाही शासन झालेलं नाही.
राजस्थानात यात फार काही वावगं वाटण्यासारखं नाही. या राज्यात, सरासरी दर ६० तासाला एका दलित बाईवर बलात्कार होतो.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाच्या आकडेवारी आणि अहवालांवरून असं दिसतं की १९९१ ते १९९६ दरम्यान अनुसूचित जातीच्या महिलांवर लैंगिक अत्याचाराचे ९०० गुन्हे नोंदवले गेले. म्हणजेच वर्षाला १५० गुन्हे – किंवा दर ६० तासाला एक. (काही महिन्यांची राष्ट्रपती राजवट वगळता या राज्यात या संपूर्ण काळात भारतीय जनता पक्ष सत्तेत होता.) या आकड्यांवरून वास्तव मात्र समजत नाही. या राज्यात अशा तऱ्हेचे गुन्हे नोंदवले न जाण्याचं प्रमाण बहुधा देशभरात सगळ्यात जास्त आहे.
धोलपूर जिल्ह्याच्या नकसोदा गावात तर अतिशय नाट्यमय असा अत्याचार झालेली व्यक्ती आता गाव सोडून पळून गेली आहे. एप्रिल १९९८ मध्ये दलित असलेल्या रामेश्वर जटाव याने वरच्या जातीच्या, गुज्जर असणाऱ्या एका व्यक्तीला उसने दिलेले १५० रुपये परत मागितले. असं करणं म्हणजे संकटाला आवतनच. त्याची ही हिंमत गुज्जरांना चांगलीच झोंबली आणि त्यांच्या एका गटाने रामेश्वरच्या नाकाला भोक पाडलं, त्यातनं तागाची एक वेसण घातली, १ मीटर लांब आणि २ मिमि जाड. मग ती वेसण हातात धरून अख्ख्या गावात त्याची धिंड काढण्यात आली.
ही घटना सगळ्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर झळकली आणि देशभरात संतापाची लाट उसळली. देशाबाहेरही याचा बोलबाला झाला, वर्तमानपत्रात आणि दूरदर्शनवर. पण इतकी सगळी चर्चा होऊनही न्यायदानावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. गावातली दहशत आणि स्थानिक पातळीवर सूडबुद्धीने काम करणारं प्रशासन यांनी न्याय कसा मिळणार नाही याची काळजी घेतली. यातलं सनसनाटी आणि धक्कादायक असं सगळं सरल्यावर वर्तमानपत्रंही ही घटना विसरली. बहुधा मानवी हक्क गटही. माध्यमांनी साथ सोडल्यानंतर या घटनेतल्या बळींनाच पुढच्या अक्रिताला सामोरं जावं लागलं. रामेश्वरने न्यायालयात आपलं म्हणणं बदललं. होय, अत्याचार तर झाला होताच मात्र त्याच्या तक्रारीमध्ये ज्या सहा जणांची नावं होती, त्यांनी तो केला नव्हता. दोषींना तो काही ओळखू शकला नाही.
ज्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामेश्वरला झालेल्या जखमांची सविस्तर नोंद केली होती, त्यांना काही स्मरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. होय, रामेश्वर त्या जखमा घेऊन त्यांच्याकडे आला होता. मात्र त्याला या विचित्र जखमा कशा झाल्या हे सांगितल्याचं काही आता स्मरत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.





