२००५ च्या जानेवारीमध्ये भोली देवी विष्णोई यांच्यावर दरीबामध्ये डायन असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याला आता पंधरा वर्षं होऊन गेलीत. त्या दिवशी, राजस्थानातल्या या गावातल्या तीन महिलांनी भोली यांच्यावर आपल्या मुलांवर करणी करून त्यांना आजारी पाडल्याचा आरोप केला होता. त्यांनी अख्ख्या गावासमोर त्यांना चेटकीण म्हटलं, त्या इतरांच्या शरीरात शिरून आजार आणतात, असा त्यांचा आरोप होता.
या घटनेच्या चार महिन्यांनंतर भोली आणि त्यांच्या कुटुंबाला आपलं घर सोडून जाणं भाग पडलं. सुवाना तुक्यातील दरीबा या ५०० घरांची वस्ती असलेल्या आपल्या गावाहून ते १४ किलोमीटर दूर भिलवाडा शहरात निघून गेले.
शेती व घरकाम करणाऱ्या आणि आता अंदाजे पन्नाशीच्या असलेल्या भोली म्हणतात की त्यांचा करणी वगैरेंवर विश्वास नाही. पण प्रथेनुसार जोवर त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिला त्यांचा प्रसाद स्वीकार करून त्यांना "पापमुक्त" करत नाहीत, तोवर त्यांच्यावरचा 'डायन' (किंवा 'डाकन') हा ठपका पुसला जाणार नाही, त्या सांगतात.
बराच काळ भोली यांनी आपल्या नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना खूश करण्यासाठी सारं काही केलं – पुष्कर, हरिद्वार आणि केदारनाथची यात्रा, गंगेत स्नान, उपास-तापास इत्यादी. हे केलं तर त्यांच्यावरचा चेटकिणी असल्याचा ठपका पुसला जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं होतं.
"यात्रा, उपास-तापास करून झाल्यावर आमच्यातल्या रीतीप्रमाणं काही जोडप्यांना दावत देत असतात. पण एकही जण माझ्या दारी फिरकला नाही," भोली म्हणतात. बहिष्कार संपावा म्हणून गावातल्या सणांदरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरी आणि गावात दावत ठेवली होती. भोली यांच्या अंदाजानुसार त्यांनी गेल्या काही वर्षांत अशा दावतींवर १० लाखांचा खर्च केले असेल.
भोली यांना सहन करावा लागलेला बहिष्कार भिलवाडा जिल्ह्यात नवीन नाही, तारा अहलुवालिया म्हणतात. २००५ मधील घटनेनंतर त्यांनी भोली आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं एका न्यायालयीन याचिकेद्वारे प्रथम सूचना अहवाल (एफआयआर) दाखल केला होता. अहलुवलिया भिलवाडा स्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत.







