हे सगळं चालू असताना त्यांची मुलगी आशा साड्यांचे गठ्ठे सोडायला लागते. “आम्ही दोघी एकत्र काम करतो,” आपल्या १३ वर्षांच्या लेकीकडे निर्देश करत शांती सांगतात. आशाची सुरत महानगरपालिका चालवत असलेली उडिया माध्यमाची शाळा ८ वी पर्यंतच होती त्यामुळे नंतर ती सोडावी लागली आणि खाजगी शाळेत जाणं त्यांना परवडणारं नव्हतं. या मायलेकी जरा महागाच्या असणाऱ्या, जास्त भरतकाम असणाऱ्या साड्यांवर एकत्र काम करतात आणि साडीमागे ५ ते १० रुपये कमवतात. यात काही तरी चूक होण्याची शक्यता पण तशी जास्त असते. “आमच्या खोलीचं छत उंचीला कमी आहे आणि उजेड पण कमीच असतो त्यामुळे घराच्या आत काम करणं मुश्किल होतं. त्यामुळे मग आम्ही बाहेर उंचावरती या साड्या अडकवतो आणि जवळ जवळ दिवसभर उभ्याने काम करतो. कापडावर एखादा डाग पडला तरी आमच्या मजुरीतून पैसे कापून घेतात,” शांती सांगतात.
कपड्यांच्या कारखान्यामधलं त्यांचं अगदी खालचं स्थान आणि अधिकृत आकडेवारीमध्ये कुठेही उल्लेखच नाही यामुळे अशा घरी बसून काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या किती आहे याचाही स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. “त्यांच्यापैकी कुणीही कसलाही लेखी करार केलेला नाही, खरं तर त्यांना काम देणाऱ्या मुकादमाचं नावही त्यांना माहित नसण्याची शक्यता आहे,” भारताच्या पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या ओडिशातल्या कामगारांबरोबर कार्यरत आजीविका ब्यूरो या सुरतेतल्या सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय पटेल सांगतात. “अनेकदा तर त्यांचं काम म्हणजे श्रम आहेत हेदेखील त्या स्त्रियांना आणि त्यांच्या घरच्यांना पटत नाही कारण हे काम घरी बसून केलेलं असतं. दिवसाकाठी किती नग द्यायचे हे पक्कं असल्याने कधी कधी तर लहान मुलांनाही कामात ओढलं जातं. आणि त्यामुळेच त्या त्यांना मिळणाऱ्या मजुरीबाबत काहीच घासाघीस करत नाहीत.”
गुजरात किमान वेतन (एप्रिल ते सप्टेंबर २०१९, दर सहा महिन्यांनी यात महागाई दराशी सुसंगत बदल केले जातात) कायद्यानुसार ‘तयार कपडे बनवणे, किंवा त्यासोबतच्या गोष्टी तयार करणे आणि शिलाई काम’ यामध्ये गुंतलेल्या कामगारांना आठ तासांच्या पाळीसाठी दिवसाला रु. ३१५ इतकी मजुरी मिळायला पाहिजे. मात्र रेणुका, शांती आणि इतर महिला जे काम करतायत ते नगावर मोजलं जातं आणि त्यांना राज्याने निर्धारित केलेल्या किमान वेतनाच्या निम्म्याहून कमी मजुरी दिली जाते. इथल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना याच धागा तोडण्याच्या कामासाठी महिन्याला ५,००० ते ७,००० रुपये मिळतात आणि कदाचित जादा कामासाठी भत्ता, कामगार विमा अशा सामाजिक सुरक्षेचाही लाभ मिळू शकतो. घरी बसून काम करणाऱ्या कामगार मात्र महिन्याला ३००० रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकत नाहीत आणि कामासंबंधीचे सगळे खर्चही त्यांनाच उचलावे लागतात.
“दहा वर्षांपूर्वी देखील मला एका साडीमागे २ रुपयेच मिळत होते. मी जर कधी मुकादमापाशी पैसे वाढवून देण्याचा विषय काढला तर तो मला सांगतो की मी घरी बसूनच काम करतीये आणि तसंही या कामात फार काही कौशल्य लागत नाही. पण मला विजेचं बिल, खोलीचं भाडं भरावं लागतं, त्याचं काय?” ३२ वर्षांची गीता सामल गोलिया विचारते. तिचा नवरा राजेश यंत्रमाग कामगार आहे. गोलिया कुटुंब मीना नगरपासून चार किलोमीटरवर विश्राम नगरमध्ये राहतं.