निवडणुका आणि मतदानाचा विचारही सी सुब्बलक्ष्मींच्या मनाला शिवणं शक्य नाही कारण पाण्याचे सहा हंडे एका वेळी नेता येईल अशी खास ढकलगाडी घेऊन त्या रस्त्याच्या पलिकडे घाईघाईत निघाल्या आहेत. त्यांच्या घराजवळच काही अंतरावर त्यांनी ही खास ढकलगाडी विकत घेतलीये. शेतात मजुरी करणाऱ्या सुब्बलक्ष्मींचे सगळं पाणी स्वतः डोक्यावर वाहून आणायचे कष्ट तरी त्यामुळे वाचतायत. “आम्ही पुरते गाळात गेलोय,” कुमारेड्डय्यापुरम गावच्या या रहिवासी म्हणतात.
४८ वर्षीय सुब्बलक्ष्मींना मतदान सोडून इतर गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतंय यालाही कारणं आहेत, पण त्यांचं गाव येतं ते थूथुकोडी इथे मात्र तमिळ नाडूतली सगळ्यात मोठ्या असामींमधली लढत रंगणार आहे. द्रविड मुन्नेत्र कळगम (द्रमुक) च्या एम. कन्निमोळी – दिवंगत डीएमके नेते एम. करुणानिधी यांची कन्या – आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष तमिळसाई सौंदराजन यांच्यात मुकाबला होणार आहे. २०१४ साली अण्णा द्रमुकच्या जयसिंग थ्यागराज यांनी द्रमुकच्या जगन पी. यांना हरवून ही जागा जिंकली होती.
१३ लाख मतदार असणाऱ्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व मिळण्याचं दुसरं एक कारण म्हणजे गेल्या वर्षी थूथुकोडी इथे झालेल्या आंदोलनाला लागलेलं हिंसक आणि दुःखद वळण. अगदी २४ किमीवर असणाऱ्या कुमारेड्डय्यापुरममधल्या अनेकांनी त्याचे चटके सोसले आहेत.
१२ फेब्रुवारी २०१८ रोजी या गावातले सुमारे ३०० जण (वेदांता लि. चा एक उद्योग असणाऱ्या) स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विस्तारीकरणाविरोधात निदर्शनं करण्यासाठी थूथुकोडीच्या मुख्य चौकात ठिय्या देऊन बसले. परवानगी दिलेल्या वेळेनंतरही आंदोलकांनी तिथून उठण्यास नकार दिला आणि कालांतराने त्यांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडली आणि २४ मार्च २०१८ रोजी सुमारे २ लाख लोक थूथुकोडीच्या रस्त्यावर उतरले. या भागातला स्टरलाइटच्या नव्या तांबे शुद्धीकरण प्रकल्पाचं बांधकाम थांबवण्यात यावं अशी मागणी घेऊन विविध पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या उद्योगात असणारे लोक एकत्र येऊन आंदोलन करत होते. सध्याच्या स्टरलाइट उद्योगामुळे त्यांचं पाणी, पर्यावरण विषारी झाल्याचं आणि त्यांच्या उपजीविका उद्ध्वस्त झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं.







