६ मार्च रोजी नाशिकहून मोर्चा निघाला तेव्हा दिंडोरी तालुक्याच्या दोंडेगावच्या ६० वर्षांच्या रुकमाबाई बेंडकुळे, मोर्चात सर्वात पुढे, हातात लाल बावटा घेऊन जोशात नाचत होत्या. अशाच इतर हजारो शेतकरी बायांनी मुंबईला मोर्चा नेला, तळपत्या उन्हात अनवाणी चालत, आणि काहींनी तर, घरी कुणी पहायला नाही म्हणून पोरांना, नातवंडांना सोबत घेऊन. (वाचा रानातून आणि वनातूनः चलो मुंबई आणि लाँग मार्चः भेगाळलेली पावलं तरी अभंग अशी उमेद )
नाशिक, पालघर, डहाणू, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातल्या तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या इतर शेतकरी बाया प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या आदिवासी शेतकरी बायांची घरची स्थिती अशी आहे की जमीन अगदी कमी असल्याने त्या दुसऱ्यांच्या रानात मजुरी करायला जातात. आठवडाभराच्या या मोर्चामध्ये सामील झाल्यामुळे यातल्या सगळ्यांचीच महिन्याच्या कमाईचा मोठा हिस्सा असणारी आठवडाभराची मजुरी बुडाली.
“शेतीतली बहुतेक सगळी कामं (पेरणी, लावणी, कापणी, झोडणी, रानातून पीक घरी आणणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि दुधाचा धंदा) बायाच करतात,” पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे संस्थापक संपादक पी साईनाथ सांगतात. “पण – कायद्याच्या विरोधात जाऊन – आपण त्यांना जमिनीचा हक्क नाकारतो, इतकंच काय आपण त्यांना साधं शेतकरीही मानत नाही.”
अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या या मोर्चात शेतकरी – गडी आणि बाया दोघंही आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी रस्त्यात उतरले. २००६ च्या वन हक्क कायद्याची अंमलबजावणी ही त्यातली मोठी मागणी, ज्यामुळे ते वर्षानुवर्षे कसत असणाऱ्या जमिनी त्यांच्या नावे होऊ शकतात.
मोर्चातल्या काही शेतकरी बायांची ही व्यक्तीचित्रं.
अनुवादः मेधा काळे