“मी त्या दिवशी पळालो तसा अख्ख्या जिंदगीत पळलो नसीन जी,” आपली बायको सुलोचना आणि १८ वर्षांची दिशा आणि १५ वर्षांची वैष्णवी या आपल्या मुलींकडे नजर टाकत कसनुसं हसत अत्राम सांगतात. त्या दिवशी अत्रामांची साक्षात मृत्यूशीच गाठ पडली होती. ते सांगतात, त्या दिवशी घरी पोचल्यावर त्यांनी गोठ्याशेजारी असणाऱ्या त्यांच्या एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं आणि रात्रभर ते तिथनं बाहेर निघाले नाहीत. रात्रभर त्यांच्या शरीराला कंप सुटला होता, ते सांगतात.
“अजी, लगित मोठ्ठा होता जी,” आपल्या वऱ्हाडी बोलीत ते सांगतात. त्यांचा आवाज मिस्किल असला तरी त्यात फुशारकी नव्हती. त्यांना भीती वाटली का? “मंग का जी!” त्यांच्या मुली त्यांच्याकडे पाहून हसू लागल्या.
वाढता माणूस-वाघ संघर्ष
अत्रामांचं वाघापासून बचाव करू पाहणारं हे चिलखत म्हणजे विदर्भाच्या जंगलांमधल्या वाढत्या माणूस-वाघ संघर्षाचंच एक रुप आहे.
हे सगळं अलिकडे सुरू झालंय, बोराटीचे अनुभवी शेतकरी आणि रोजंदारीवर वनरक्षक म्हणून काम करणारे सिद्धार्थ दुधे सांगतात. शक्यता आहे की इथे आलेले वाघ हे जवळच्या संरक्षित वनांमधून, उदा. बोराटीपासून नैऋत्येला १०० किमीवर असणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातून इथे भटकत आले आहेत. “इथे भीती आहे, काळजी आहे आणि तणाव आहे,” ते म्हणतात.
यवतमाळ जिल्ह्यातल्या झुडुपांच्या आणि पानगळीच्या जंगलांमध्ये दाट लोकसंख्येची गावं आहेत. भटकंती करणारे हे वाघ गवत खाणाऱ्या प्राण्यांची आणि गावातल्या गुरांची शिकार करतात, अत्रामांच्या घरी बसलेले मेश्राम सांगतात. “सध्या तरी टी १ आमच्या गावाच्या आसपास दिसलेली नाही,” ते म्हणतात. “पण तिचा ठावठिकाणा समजला की आम्ही लक्ष ठेऊन असतो आणि गावकऱ्यांना सावध करतो.”
या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत, महाराष्ट्राचे मुख्य वन संवर्धन प्रमुख, अशोक कुमार मिश्रा सांगतात. “वाघांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचं यश म्हणून एकीकडे वाघांची संख्या वाढत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे संघटित शिकारीवर करडी नजर ठेवणं. दुसरीकडे मानवी हस्तक्षेप प्रचंड आहे, म्हणजे जंगलांवर वाढतं अवलंबित्व आणि वाढती लोकसंख्या.”
त्यात, विविध प्रकल्पांमुळे, जसं की रस्ते आणि महामार्ग, विदर्भांची जंगलं तुकड्या-तुकड्यात विभागली जात आहेत. मिश्रा सांगतात की वाघांचे अधिवास कमी होत चाललेत किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्यांचे पूर्वापारपासून अस्तित्वात असलेले संचाराचे मार्ग खंडित झाले आहेत त्यामुळे त्यांना भटकायला रानच राहिलेलं नाही. मग संघर्ष होणार नाही तर दुसरं काय होणार? “हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला नाही तर तो आणखी तीव्र होत जाईल.”