“चौदा, सोळा, अठरा...” खंडू माने अठ्ठ्याच्या पाठीवरच्या खोळीत दोन्ही बाजूला दोन दोन अशा कच्च्या विटा लादतायत. अठरा विटा झाल्या की ते अठ्ठ्याच्या पाठीवर काठी टेकवतात आणि म्हणतात, “चला...फुर्रर्र...फुर्रर्र...” अठ्ठ्या आणि त्याच्यासोबतची दोन गाढवं भट्टीच्या दिशेने चालायला लागतात. अंदाजे ५० मीटर अंतरावरच्या भट्टीपाशी विटा रचायचं काम सुरू आहे.
“आणखी एक तासभर, मग सुट्टी,” माने म्हणतात. सुट्टी? आता तर सकाळचे फक्त नऊ वाजलेत. आमचे कोड्यात पडलेले चेहरे पाहून ते सांगतात, “मध्यरात्री, अंधारात एक वाजल्यापासून काम सुरू होतंय. सकाळी १० वाजता सुट्टी होणार. रातभर हे असंच चालू आहे.”
मानेंची चार गाढवं विटा उतरवून परत आली आहेत. पुन्हा तेच काम सुरू. “चौदा, सोळा, अठरा...”
आणि अचानक एका गाढवाला ते म्हणतात, “रुको...” आम्ही परत कोड्यात. “आपल्याकडच्या गाढवांना मराठी कळतंय. हे राजस्थानातलं हाय. त्याला हिंदीत सांगावं लागतंय,” माने खळखळून हसतात. आणि आम्हाला प्रात्यक्षिकच करून दाखवतात. रुको. गाढव थांबतं. चलो. निघालं.
आपल्या या चतुष्पाद प्राण्यांबद्दलचा अभिमान खंडूभाऊंच्या चेहऱ्यावर दिसत राहतो. “लिंबू न् पंधऱ्या चरायलेत. आन् बुलेट बी. असली देखणी हाय आन् पळती बी लई जोरात!”
















