हिरा निनामा आणि कल्पना रावल, दोघी ३५ वर्षांच्या आहेत. एकीमेकींपासूनचं अंतर १५ किलोमीटर, पण मुलगा हवा ही दोघींची इच्छा मात्र सारखीच. “आई-वडलांना मुलींचा काय फायदा?” बांसवाडा जिल्ह्यातल्या सेवना गावी मी हिराला भेटले तेव्हा ती म्हणाली. “वारस हवाच – किमान एक तरी मुलगा पाहिजेच,” याच जिल्ह्यातल्या वाका गावी कल्पना म्हणते.
२०१२ पासून गेल्या ७ वर्षांत हिराने सहा मुलींना जन्म दिलाय. गृहिणी असलेली हिरा अधून मधून शेतात मजुरी करते. सर्वात धाकटी मुलगी काही महिन्यांची आहे. “सहव्यांदा मुलगीच झालीये, मला कुणी सांगितलंच नाही. पण माझ्या सासूचं रडणं मी ऐकलं आणि माझ्याही डोळ्याला धारा लागल्या. माझ्या नवऱ्यापेक्षाही मी जास्त रडले असेन,” ती सांगते.
“मला दुसरी मुलगी झाली, तेव्हापासून मी बाबाजींकडे जातीये. ते एका नारळावर मंत्र टाकतात. मग तो फोडून त्यातलं पाणी मी पिते. त्यांचं म्हणणंय मी माझ्या आईपेक्षा जास्त कमनशिबी आहे,” स्वतः पाच बहिणींमधली सर्वात धाकटी असणारी हिरा म्हणते.
१२३७ लोकसंख्या असलेल्या सेवना गावची रहिवासी हिरा भिल आदिवासी आहे. ती निरक्षर आहे. एकामागून एक अनेक बाळंतपणं झालेल्या तिच्या आणि तिच्यासारख्याच इतर बायांना आरोग्याच्या बाबतीत मोठी किंमत मोजावी लागते – वयाच्या मानाने ती खूप अशक्त, वयस्क दिसते, तिचं शरीर सारखं ठणकत असतं आणि मनावरही सारखं दडपण असतं.








