गूगल मॅप्सनी मला सांगितलं की माझं ठिकाण जवळ येत चाललंय. पण बाहेर पाहतो तर सगळा परिसर मला आठवतो त्यापेक्षा नक्कीच काही तरी वेगळा दिसत होता. समुद्र किनाऱ्यावर एक पडझड झालेलं घर होतं ते काही दिसेना. मी मागल्या वेळी उप्पाडाला आलो होतो तेव्हा त्या घराची पक्की जागा आणि तिचे नकाशावरचे आकडे मी माझ्या फोनमध्ये नोंदवून घेतले होते. ‘ते घर होय? – ते गेलं समुद्रात – पार तिकडे!’ बंगालच्या उपसागरा उसळणाऱ्या एका लाटेकडे बोट दाखवत टी. मारम्मा अगदी सहज सांगते.
२०२० साली देशभरात टाळेबंदी जाहीर झाली त्याच्या अगदी काही आठवडे आधी मी मारम्मा आणि त्यांच्या कुटुंबांची काही छायाचित्रं घेतली होती. समुद्राच्या किनाऱ्यावरचं ते जुनं, पडकं घर विलक्षण दिसत होतं, उदासही. चिंचोळ्या किनारपट्टीवर उभा असलेला घराचा तो उरला सुरला भागही तसा डळमळीतच होता. मारम्माचं एकत्र कुटुंब एकविसाव्या शतकाची सुरुवात झाली तोपर्यंत तिथे राहत होतं.
“चांगल्या आठ खोल्या आणि तीन गोठे होते. सगळे मिळून इथे १०० माणसं रहायची,” मारम्मा सांगते. पन्नाशीची मारम्मा इथली साधी राजकारणी आहे आणि पूर्वी तिचा मच्छीचा धंदा होता. २००४ साली त्सुनामी आली त्या आधी उप्पाडात आलेल्या वादळात घराचा मोठा हिस्सा कोलमडून पडला. त्यामुळे या एकत्र कुटुंबाची फाटाफूट होऊन ते वेगवेगळे रहायला लागले. मारम्मा दुसरीकडे रहायला गेल्या पण त्या आधी याच जुन्या घरात काही वर्ष राहिल्या.
ही काही एकट्या मारम्माची गोष्ट नाहीये. उप्पाडातल्या जवळपास प्रत्येकालाच समुद्र आत येत चालल्यामुळे एक तरी घर बदलायलाच लागलं आहे. स्वतःला आलेला अनुभव आणि इथल्या राहणाऱ्यांच्या आपसूक नेणिवेतून आता घर कधी सोडायचं हे समजायला लागलं आहे. “लाटा उसळत पुढे पुढे यायला लागल्या ना की आम्हाला समजतं की आता आपलं घर समुद्रात जाणार. मग आम्ही आमचा सगळा पसारा एका बाजूला करतो [तात्पुरती सोय म्हणून भाड्याचं घर पाहतो]. त्यानंतर साधारण महिनाभरात जुनं घर पाण्यात गेलेलं असतं,” ओ. सिवा सांगतो. १४ वर्षांच्या सिवानेही एक घर बदललं आहे.















