‘‘ही बघा, माझी मोटर मातीत गाडली गेली होती,’’ पुराच्या पाण्यात बुडालेला आपला पंप खोदून काढताना देवेंद्र रावत म्हणतात. मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्ह्यातल्या सुंड गावातला हा शेतकरी. ‘‘माझी जमीन अक्षरशः वाहून गेली या पुरात. तीन पंप चिखलात रुतून बसले आहेत, विहीरही ढासळली आहे. काय करू आता मी?’’ ४८ वर्षांचे देवेंद्र सवाल करतात.
नरवर तालुक्यात, सिंध नदीच्या दोन उपनद्यांच्या मध्ये सुंड गाव वसलं आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६३५. नदीला २०२१ मध्ये पूर आला तेव्हा गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं. आधी कधी असा पूर आल्याचं आपल्याला आठवत नसल्याचं देवेंद्र सांगतात. ‘‘या पुराने तीस बिघा (साधारण १८ एकर) जमिनीवरचं सगळं पीक वाहून नेलं. माझ्या कुटुंबाची सहा बिघा (साधारण ३.७ एकर) जमीन पुरात खरवडून गेली.’’
काली पहाडी गाव तर संपूर्ण पुराच्या पाण्याने वेढलेलं होतं, जणू एखादं बेटच. आता कधी जास्त पाऊस पडला आणि लोकांना दुसर्या तीराला जायचं असेल तर पाण्यातून पाय ओढत चालावं लागतं किंवा चक्क पोहत जावं लागतं.
‘‘पूर आला तेव्हा अख्खे तीन दिवस आमचं गाव पाण्याखाली होतं,’’ देवेंद्र सांगतात. सरकारने बोटी पाठवल्या आणि लोकांना बाहेर काढलं. दहा-बारा जण गावाबाहेर यायला तयार झाले नाहीत. ते गावातच राहिले. जे गावकरी बोटीतून गावाबाहेर पडले त्यापैकी काहींनी जवळच असणार्या बाजारपेठेत आसरा घेतला आणि काही जण जवळच्या गावांमध्ये राहाणार्या आपल्या नातेवाईकांकडे निघून गेले. पूर आला तेव्हा गावातली वीज गायब झाली. ती यायला एक महिना लागला. देवेंद्रना हे सगळं लख्ख आठवतंय.










