शेजारच्या गावातल्या बायांना अखेर त्यांचा म्होरक्या रणांगणावर सापडला. आपल्या घरच्या पुरुष मंडळींचा शोध घेत घेत त्या तिथे पोचल्या होत्या. ते राहिलंच पण त्यांचा नेता उमइदुराई गंभीर जखमी झाला होता, रक्तस्राव होत होता, पण अंगात प्राण होता. त्यांनी त्याला अलगद उचललं आणि तीन मैल चालत आपल्या गावी नेलं.
थोड्याच वेळात सैनिक तिथे पोचले. ‘वॉण्टेड’ असलेल्या उमइदुराईला शोधत. या बायांनी झटकन त्याच्या अंगावर पांढरी चादर टाकली आणि त्या हमसून हमसून रडायला लागल्या, त्यांच्या रडण्याचा आवाज टिपेला पोचला आणि त्यांनी त्या सैनिकांना बातमी दिली की देवी आल्या आणि तो मरण पावला. आपल्या जिवाच्या भयाने त्या सैनिकांनी तिथून पळ काढला. तिथल्या अनेकांचे आणि उमइदुरईचे प्राण मात्र वाचले.
भारी आणि खरी गोष्ट आहे ही. तमिळ नाडूमध्ये २०० वर्षांपूर्वी घडलेली. या लढ्याच्या स्पष्ट आठवणी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या नोंदींमध्ये सापडतात. आणि आता त्याच स्मृती विख्यात लेखक चो धर्मन त्यांच्या ओघवत्या तमिळमध्ये सांगतात तेव्हा त्यातलं नाट्य आणखीच रंगतं. सध्याच्या कोविड-१९ महामारीची भय आणि भीतीच्या संदर्भातली तिची मांडणी अधिक जोरकसपणे पुढे येते. आणि त्यासोबतच आपल्याला समजतो गावांचा शतकानुशतकं सुरू असलेला विषाणू, प्लेग आणि साथींशी मुकाबल्याचा अतिशय अनमोल असा मौखिक इतिहास.
“उमइदुरई म्हणजे दैवतासमान असलेले स्वातंत्र्य सैनिक वीरपांडिय कट्टबोम्मन यांचे बंधू. कट्टबोम्मन [तमिळ नाडूच्या दक्षिणेकडच्या] पंचालमकुरिचीचे पोळिगर [प्रमुख] होते,” धर्मन सांगतात. “मूक बधिर असलेल्या उमइदुरईंना लोक म्हणायचे ऊमी आणि [ब्रिटिश म्हणायचे] डम्बी. लोकांचे ते फार लाडके होते. ईस्ट इंडिया कंपनी मात्र त्यांच्या मागावर होती कारण त्यांना या ‘नाठाळ आणि लाडक्या’ म्होरक्याचा खात्मा करायचा होता. कर्नल जेम्स वेल्शचं पुस्तक आहे, मिलिटरी रेमिनिसन्सेस (सैन्याच्या गतस्मृती), त्यात तुम्हाला हे सारं वाचायला मिळेल,” धर्मन माहिती देतात.
पंचलमकुरिचीचा ऐतिहासिक लढा १७९९ साली लढला गेला ते स्थळ थूथुकोडी जिल्ह्यातल्या कोविलपट्टी या शहरातल्या धर्मन यांच्या घरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. इंग्रज कर्नल वेल्शने या आठवणींमध्ये उमइदुराईची सुटका करणाऱ्या या स्त्रियांची संभावना “वाईट, डोक्याने अर्धवट जीव” अशी केली असली तरी धर्मन यांना मात्र रणांगणावरून उमइदुराईला आपल्या घरी नेणाऱ्या या स्त्रियांचं शौर्य आणि गावकऱ्यांची उपजत शहाणीव या दोन्हीचं फार कौतुक आहे. “मला सांगा,” ते म्हणतात, “त्याच्या सगळे मागावर आहेत, सैनिक लवकरच त्यांच्यापर्यंत पोचतील, त्यांची घरं उद्ध्वस्त करतील याची त्या शूर स्त्रियांना कल्पना नव्हती का?”








