तिरु मूर्तींच्या वडलांचं आज वर्षश्राद्ध आहे. सुंदरमूर्तींच्या हार घातलेल्या तसबिरीसमोर लाल केळ्यांचा घड, फुलं, नारळ, पेटलेला कापूर ठेवलाय. पण तिरु मूर्तींनी मात्र काही वेगळ्याच गोष्टी समोर ठेवलेल्या आहेतः दहा प्रकारचे साबण, नारळाच्या तेलाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचं सगळ्यात आवडतं उत्पादनः दळलेली हळद.
“अप्पांना याहून चांगलं मी काय वाहणार?” आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते विचारतात. त्यांच्या वडलांनी मंजळ म्हणजेच हळदीची शेती सोडून दिली होती. सगळ्यांचा विरोध पत्करून तिरूंनी ही शेती नव्याने सुरू केली. “लोक मला सांगायचे, मल्ली (मोगरा) लाव, कारण फुलात रोजचा पैसा आहे. मी हळद लावली तेव्हा सगळे मला हसले होते,” ते हसतात. तिरूंनी त्या सगळ्यांचं म्हणणं खोटं ठरवलंय. आणि त्यांची गोष्ट तशी दुर्मिळच – एका शेतकऱ्याच्या यशाची गोष्ट.
४३ वर्षांचे तिरू मूर्ती भावासोबतच्या सामायिक १२ एकरात शेती करतात. तमिळ नाडूच्या इरोडे जिल्ह्यातल्या भवानीसागर तालुक्यात उप्पुपालम वस्तीमध्ये त्यांची जमीन आहे. ते तीन पिकं घेतात – हळद, केळी आणि नारळ. पण ते ठोक बाजारात विक्री करत नाहीत. किंमतीवर आपलं काहीच नियंत्रण नाही तर विकून काय उपयोग, असा त्यांचा रोकडा सवाल आहे. स्थानिक पातळीवर, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठे व्यापारी, कॉर्पोरेट मंडळी आणि सरकारच भाव ठरवतं.
हळदीचा बाजार तेजीत आहे आणि जगभरात भारताची इथे चांगलीच सद्दी आहे. २०१९ साली १९ कोटी डॉलर मूल्याची – एकूण जागतिक व्यापाराच्या ६२.६ टक्के - हळद निर्यात झाली. पण मेख अशी की भारत हळद आयातही करतो. ११.३ टक्के हळद आयात होते आणि जगभरात आयात करणाऱ्या देशांमध्ये आपला दुसरा क्रमांक आहे. गेल्या काही वर्षांत आयात वाढलीये आणि त्याचा भारतातल्या हळद उत्पादकांना फटका बसला आहे.
देशातल्या बाजारात – इरोडेच्या बाजारपेठांमध्ये – आधीच त्यांची पिळवणूक होतीये. मोठे व्यापारी आणि खरेदीदार भाव ठरवतात. जैविक पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनाला अधिक भाव मिळत नाही. आणि वर्षागणिक भावात मोठे चढउतार होत असतात. २०११ साली हळदीला क्विंटलमागे १७,००० रुपये भाव मिळाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याच्या पावपटीवर भाव आला. २०२१ साली क्विंटलमागे सरासरी ७,००० रुपये भाव मिळत होता.
करामत्या स्वभाव, चिकाटी आणि समाजमाध्यमांवरचा वावर यांतून तिरु यांना एक साधासरळ उपाय गवसलाः मूल्यवर्धन. आता त्यांनी केलेलं सगळं काही बाकी सगळ्यांना शक्य होईलच असं नाही. पण त्यांनी मिळवलेलं यश कौतुकास पात्र आहे. “एका नारळाला शेताच्या बांधावर १० रुपये मिळतात. पण मी त्याचं तेल काढतो आणि त्याचा साबण तयार करतो. हळदीचंही तसंच,” ते सांगतात. “मी १.५ एकरात हळद पिकवतो. मला जर बाजारात ३ क्विंटल हळद विकायची असेल तर या जैविक उत्पादनावर मला किलोमागे ५० रुपये तोटा सहन करावा लागेल,”



























