एस. रामसामी माझी त्यांच्या एका फार जुन्या सवंगड्याशी ओळख करून देतात. त्यांच्या या मित्राला भेटायला खूप सारे लोक येतात. वर्तमानपत्रातले, टीव्ही वाहिन्यांवरचे, अगदी प्रशासकीय सेवेतले भाप्रसे, भापोसे... चिक्कार. रामसामी कुठलेही तपशील सांगायला विसरत नाहीत. आता ते एका व्हीआयपी, सेलेब्रिटीबद्दल सांगतायत म्हणजे तुम्हीच समजून घ्या जरा.
आणि त्यांचा हा सवंगडी आहे २०० वर्षांचा जुना वृक्ष - मलिगमपट्टुचा थोर ‘आयिरमकाची’.
आयिरमकाची हा फणसाचा वृक्ष आहे. रुंद, उंच आणि फळांनी लगडलेला. त्याचा बुंधा इतका रुंद आहे की त्याला फेर घालायचा तर २५ सेकंद लागतात. त्याच्या या पुरातन खोडावर किमान शंभर काटेरी फणस लागलेत. या वृक्षासमोर उभं राहणं मानाचं आहे. त्याला फेर घालणं अगदी खास. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून रामसामी हसतात. त्यांना झालेला आनंद आणि या वृक्षाबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या डोळ्याच्या कडांना टेकणाऱ्या त्यांच्या भरगच्च मिश्या खुलतात. गेल्या ७१ वर्षांमध्ये माझ्यासारखे किती तरी या वृक्षाने भारून गेलेले त्यांनी पाहिलेत. ते सांगू लागतात...
“तर, आपण कडलुर जिल्ह्याच्या पानरुती तालुक्यात, मलिगमपट्टु पाड्यावर आहोत,” फणसवृक्षासमोर उभे असलेले, पिवळ्या छटेचं धोतर नेसलेले, काटक चणीचे, खांद्यावर पंचा टाकून उभे असलेले रामसामी सांगू लागतात. “माझ्या पूर्वजांनी, पाच पिढ्या आधी हे झाड लावलं. आम्ही त्याला म्हणतो, ‘आयिरमकाची’, हजार फळांचा राजा. आता खरं तर त्याला दर वर्षी २०० ते ३०० फळ लागतं. आणि अगदी ८-१० दिवसात फणस पिकतात. गरे चवीला अगदी गोड, न्याऱ्या रंगाचे. कच्च्या फणसाची बिर्याणी पण होते.” अगदी अर्ध्या मिनिटात ते या फणसाचे गुण सांगतात. या वृक्षाप्रमाणे त्यांचं बोलणंही काळाच्या ओघात अगदी आखीव रेखीव झालंय.


















