सविंदण्यातली एप्रिल महिन्यातली रात्रीची गार हवा. घड्याळात २ वाजलेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या शिरूर तालुक्यातल्या या गावात मंदिरासमोरच्या खुल्या मैदानात चमचमत्या रंगीत दिव्यांच्या उजेडात हिंदी सिनेगीतांवर नर्तकींचे पाय थिरकतायत. लल्लन पासवान आणि त्याच्या साथीदारांचं मात्र या नाचकामाकडे लक्ष नाहीये. शिट्टया वाजवणारे पुरुष आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या स्पीकर्सपासून लांब, छोटीशी डुलकी काढण्यासाठी त्यांनी एक निवांत जागा शोधलीये. त्यातले काही जण मोबाइल फोनवर सिनेमा पाहून वेळ काढतायत.
“हे काम फार थकवणारं आहे. आम्ही रात्रभर जागे असतो, मालकांना वाटतं आम्ही त्यांच्यासाठी सगळा वेळ काम करावं,” लल्लन पासवान सांगतो. आता १९ पूर्ण असलेला लल्लन (शीर्षक छायाचित्रात) ‘मंगला बनसोडे आणि नीतीन कुमार तमाशा मंडळी’सोबत वयाच्या १३व्या वर्षापासून काम करतोय. तो ३० कामगारांच्या गटातला एक. उत्तर प्रदेशच्या लखनौ जिल्ह्याच्या माल तालुक्यातल्या मलिहाबाद तहसिलातले हे सगळे कामगार बहुतकरून दलित समुदायाचे, १५ ते ४५ वयोगटातले आहेत. आणि बहुतेक सगळे एकमेकांच्या नात्यातले किंवा गावी एकमेकाच्या भावकीतले आहेत.
तमाशाचा फड एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो तिथे हे कामगार स्टेज आणि राहुट्या बांधायचं काम करतात. सप्टेंबर ते मे या आठ महिन्यांच्या हंगामात ते हेच काम किमान २१० वेळा करत असतील. तमाशा हा महाराष्ट्रातील लोककला प्रकार आहे, दररोज वेगवेगळ्या गावी मोकळ्या मैदानात तमाशा सादर केला जातो. नाच, गाणी, छोटे प्रवेश आणि वग असा एकत्र खेळ असतो. फडात कलाकार, मजूर, ड्रायव्हर, वायरमन, व्यवस्थापक आणि आचारी असा सगळा लवाजमा असतो.










