“लोकांच्या आवडी बदलल्यात, आम्ही नाही,” मंगला बनसोडे हताशपणे म्हणतात. आताशा लोकांना लोकप्रिय हिंदी गाणी हवी असतात, त्या सांगतात. “अहो, अशी पण वेळ येईल जेव्हा शिवाजी महाराजांच्या आगमना वेळीदेखील एखादं हिट गाणं वाजवावं लागेल!” त्या हसतात.

गेल्या पन्नास वर्षांच्या काळात प्रेक्षकांची आवड बदललेली त्यांनी पाहिलीच आहे, पण त्याचसोबत तमाशाचा कायापालट झालेलाही त्यांनी पाहिलाय. पूर्वीचे अंदाजे १० बाया अन् गडी घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावाला बैलगाडीने जाणारे फड आणि आता त्यांचाच एखाद्या प्रॉडक्शन हाउससारखा असणारा फड हे रुपांतर त्यांनी जवळून पाहिलंय.

मंगला बनसोडे सात वर्षांच्या असल्यापासून या व्यवसायात आहेत. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची थोरली मुलगी. तमाशाची पंढरी समजलं जाणाऱ्या नारायणगाव परिसरात विठाबाईंनी काम केलं. १९८३ पासून मंगलाताईंनी स्वतःचा फड चालवला. आता त्या सातारच्या करवडी गावी राहतात. त्यांच्या फडात एकूण १७० लोक आहेत. ‘मंगला बनसोडे आणि नीतीन कुमार तमाशा मंडळ’. नीतीन त्यांचा धाकटा मुलगा आणि या फडाचा गायक- नट-नर्तक आणि एकूणच स्टार. दर वर्षी सप्टेंबर ते मे या काळात मंगलाताईंच्या फडाचे महाराष्ट्रभर खेळ होतात.

Mangala Bansode and her younger son Nitin Kumar perform a duet during the performance in Gogolwadi village, Pune district
PHOTO • Shatakshi Gawade
A photo of tamasha empress Vithabai Narayangaonkar, Mangala Bansode’s mother, hangs in Mangala tai’s house in Karawdi village, Karad taluka, Satara district
PHOTO • Shatakshi Gawade

डावीकडेः मंगला बनसोडे आणि त्यांचा धाकटा मुलगा नीतीन कुमार पुणे जिल्ह्याच्या गोगलवाडी गावात खेळ सादर करताना. उजवीकडेः मंगलाताईंच्या घरी त्यांच्या आई तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांचा फोटो भिंतीवर दिसतोय

प्रत्येक गावात गेलं की मंगलाताईंच्या फडातले कामगार स्टेज उभं करतात आणि खेळ सादर करतात. तिकिट लावून होणारे खेळ शक्यतो तंबूत होतात आणि जर का गावच्या जत्रा समितीने सुपारी दिली असेल तर तो खेळ मोकळ्या माळावर होतो. नेहमीच्या खेळांना १,००० ते २,००० प्रेक्षक असतात तर विनातिकिट खेळाला किंवा सुपारीच्या खेळांना प्रेक्षकांची संख्या अगदी १०,००० ते १५,००० पर्यंत जाऊ शकते.

१९७० साली एक रुपयावर होणाऱ्या खेळांची तिकिटं आता ६० रुपये झाली आहेत. पण फडमालकांचं म्हणणं आहे की नफा पार कमी झाला आहे. पगार वाढले आहेत आणि ट्रक, बस, फ्लडलाइट आणि इतर उपकरणांची भर पडत असल्यामुळे निर्मिती खर्चही अफाट वाढलाय.

दुसरीकडे मंगलाताई सांगतात की प्रेक्षकांची संख्या मात्र रोडावत चाललीये. त्याचं एक कारण म्हणजे तंत्रज्ञानात झालेले बदल. आताशा बहुतेक जण टीव्ही किंवा मोबाइल फोनवर सिनेमे पाहतात. नारायणगावमध्ये एप्रिलमध्ये भरणाऱ्या जत्रेतले खेळ स्थानिक टीव्ही चॅनेलवरून दाखवले जातात. “असं असताना घर सोडून तीन तास तमाशाचा खेळ पहायला कुणी यावं?” मंगलाताई सवाल करतात.

१९७० साली एक रुपयावर होणाऱ्या खेळांची तिकिटं आता ६० रुपये झाली आहेत. पण नफा पार कमी झाला आहे. पगार वाढले आहेत आणि निर्मिती खर्चही अफाट वाढलाय

व्हिडिओ पहाः गण, नाच आणि वग हे सगळे मिळून तमाशाचा खेळ उभा राहतो.

तमाशाचे खेळ आता बहुतकरून फक्त खेड्यापाड्यातच होतात. पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावी जात असताना मंगलाताईंचा फड महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमधूनही खेळ करायचा. उदा. धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड. पुणे शहरातही त्यांचे खेळ झाले आहेत. आता मात्र ही गावं त्यांच्या यादीत नसल्यातच जमा आहेत. “पूर्वी आमचे जिल्ह्याच्या ठिकाणी खेळ व्हायचे, आता मात्र आम्ही फक्त तालुक्यांना घिरट्या घालतो,” मंगलाताईंचा थोरला मुलगा आणि फडाचे मॅनजेर असणारे अनिल बनसोडे सांगतात.

तमाशाचा सुवर्णकाळ होता तेव्हा म्हणजे अगदी १९९० पर्यंत मुंबईत देखील तमाशा व्हायचा. सप्टेंबर ते मे या हंगामात मुंबईच्या उपनगरांमध्ये फड उतरायचे आणि मग खेळ सुरू व्हायचे. प्रख्यात तमाशा कलावंत आणि फडमालक रघुवीर खेडकर म्हणतात की त्यांना  मुंबईत खेळ करून आता दोन दशकं उलटली आहेत. मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या हे त्यामागचं महत्त्वाचं कारण. मराठी बोलणारा गिरणी कामगार संख्येने कमी होत गेला किंवा मुंबई सोडून गेला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या चिंचघर गावचे खेडकर १९७० पासून, अगदी वयाच्या नवव्या वर्षापासून तमाशात काम करतायत. त्यांचा फड, ‘रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ’ १९६९ मध्ये त्यांची आई कांताबाई सातारकरांनी सुरू केला.

Male artists dressed as women during the performance in Gogolwadi village, Pune district
PHOTO • Shatakshi Gawade
Male artists take position for the gan during the performance in Gogolwadi village, Pune district
PHOTO • Shatakshi Gawade

तमाशात पुरुष हरतऱ्हेची कामं करतात. अगदी स्त्री पात्र रंगवण्यापासून (उजवीकडे) ते गण गाण्यापर्यंत (खेळाची सुरुवात, उजवीकडे)

फड मालकांच्या मते, सरकारी नियमांचाही काच तमाशाला बसलाय. “आमचे खेळ [रात्री ११ ला सुरू होऊन] सकाळी ६ पर्यंत चालायचे. आणि लोक जागचे न हलता सगळा खेळ पहायचे,” अनिल बनसोडे सांगतात. मात्र आवाजाबद्दलच्या नियमांमुळे (ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम, २००० नंतर लागू) आता तमाशा फक्त खेड्यापाड्यापुरता राहिला आहे. अगदी शहरांच्या जवळच्या गावांमध्येही रात्री १० वाजल्यानंतर खेळ करायला परवानगी नाहीये. याचा तमाशाच्या एकूण स्वरुपावरच परिणाम झाला आहे. फडमालक आता कमी वेळात खेळ सादर करण्यासाठी त्यातले प्रवेश कमी करू लागले आहेत.

“आता खेळांसाठी फार कुठे जागाच उरलेली नाही,” खेडकर म्हणतात. “त्यातही मोठमोठ्या स्पीकरमुळे तमाशाचा जो काही आवाज वाढला आहे तो भयंकर आहे. लोक घसा खरवडून गातात आणि त्यात मोठाले स्पीकर. गेल्या २० वर्षांपासून हे असंच चालू आहे. पूर्वी ३००० पब्लिक असलं तरी थोडकेच भोंगे असायचे. लोक हल्लीसारखा गिल्ला किंवा गोंधळ करत नसत. ते शांत बसून खेळ पाहत.”

A short skit on Shivaji is performed during the performance in Savlaj village, Sangli district
PHOTO • Shatakshi Gawade
Nitin Kumar, Mangala tai’s younger son, as Bhagat Singh during a dance-drama sequence in the performance in Gogolwadi village, Pune district
PHOTO • Shatakshi Gawade

डावीकडेः शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचा एक प्रसंग सादर होतोय, मु. सावळज, जि. सांगली. गोगलवाडीच्या खेळात भगतसिंगच्या भूमिकेत नीतीन कुमार

खरं तर सगळ्यात मोठा बदल झाला आहे तो तमाशाच्या सादरीकरणात आणि त्याच्या मूळ गाभ्यात. एका पारंपरिक तमाशामध्ये गण (खेळाच्या सुरुवातीची गणेशाला केलेलं नमन), गवळण (कृष्ण आणि गोपीमधल्या संवादावरचं नृत्य), बतावणी (विनोदी प्रवेश), रंगबाजी (नृत्यमाला) आणि वगनाट्य (पुराणातल्या घटनांवरचं किंवा सध्याच्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारं लोकनाट्य) असं सगळं असतं. आजही तमाशात या सगळ्या गोष्टी असल्या तरी कालांतराने त्याचं स्वरूप बदललं आहे. तमाशाची इतर अंगंही अजून आहे तशी आहेत, जसं गण सादर होत असताना सोबत टाळ, तुणतुणं, ढोलकी आणि हलगी आजही असतेच. मात्र आजचा तमाशा विविध गुण दर्शनासारखा झाला आहे ज्यात नाट्य आणि नाचाचा भरणा असतो.

पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी तमाशा फडांसोबत राहून तमाशावरती एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते दारू किंवा हुंडा अशा विषयांवर सादर होणाऱ्या वगाला आता फडांनी फाटा द्यायला सुरुवात केली आहे मात्र लोकांच्या मागणीनुसार हिंदी आणि मराठी गाण्यांवरच्या नाचांची रंगबाजी मात्र तशीच ठेवली आहे. १० वर्षांपूर्वी भंडारेंनी कोकण, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधला तमाशा छायाचित्रांमध्ये टिपला आणि या वर्षी ते परत एकदा काय बदललं आहे का ते पाहण्यासाठी तमाशांच्या फडांना भेट द्यायला गेले होते.

व्हिडिओ पहाः स्टेजवर फक्त दोन बल्ब लावलेले असायचे, ६६ वर्षांच्या मंगलाताईंना तो काळ आजही आठवतो

“आजकाल गावाकडे तमाशा सादर करायचा असेल तर आम्हाला सिनेमातली गाणी घ्यावीच लागतात. त्यामुळे मग वगनाट्याला वेळच राहत नाही,” खेडकर दुजोरा देतात. “जो प्रेक्षक आवडीने वग पहायचा तो आज काल आमच्या खेळांना येतच नाही. आमचा जवळ-जवळ २०-२५% प्रेक्षक कमी झाला आहे.”

लोकांना खरंच तमाशा आवडायचा आणि त्यातल्या कलेची त्यांना जाण होती तो काळ आता नाही याची खेडकरांना खंत वाटते. “जेव्हा मी माझा फड सुरू केला तर कलेचा दर्जा अगदी उच्च होता, आणि आम्ही आमच्याकडची हर तऱ्हेची कला सादर करू शकत होतो,” खेडकर म्हणतात. “तमाशातले काही प्रयोग अगदी उत्स्फूर्त असायचे आणि काहीचा भरपूर सराव केलेला असायचा. आम्ही खेळ सुरू असतानाच काय काय नवे प्रयोग करायचो. धमाल यायची.”  खेडकरांच्या तमाशात शास्त्रीय संगीत आणि वाद्यं असायची. ठुमरी, गझल आणि कव्वालीदेखील सादर व्हायची. आता या गोष्टीही इतिहासजमा झाल्या आहेत.

तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांमुळे प्रेक्षक तमाशाला येईनासा झाल्यावर खेडकरांनी त्यांच्या तमाशालाच ‘मॉडर्न’ स्वरुपात आणलं. “आम्ही आधी काल्पनिक कथांवरती किंवा धार्मिक कहाण्या, राजे रजवाड्यांच्या गोष्टींवर नाटक सादर करायचो. मग आम्ही खऱ्या गोष्टी, जशा वर्तमानपत्रात येतात त्या गोष्टी वापरायला सुरूवात केली,” ते समजावून सांगतात – उदा. एखाद्या दयावान गुंडावरचं नाटक किंवा हुंडा, स्त्रियांवर होणारे अत्याचार असे विषय नाटकात यायला लागले.


The audience in Gogolwadi village, Pune district
PHOTO • Shatakshi Gawade

किमान १००० प्रेक्षक खेळ पहायला यायचेआणि खास खेळांसाठी हाच आकडा १०,००० ते १५,००० पर्यंत जायचा.

खेडकरांच्या फडाने अनेक नव्या गोष्टी आणल्या, उदा. इलेक्ट्रॉनिक वाद्यं (ड्रम सेट, रिदम मशीन आणि डिजिटल ऑर्गन), झगमग दिवे, चमचम पोशाख आणि नव्या तऱ्हेचा मेक अप. त्यांना लक्षात आलं की अजूनही नऊवारी साडीत नाचणाऱ्या नृत्यांगनांच्या तमाशापासून आजचा तरूण दूर जाऊ लागलाय. “आम्ही तरुणांना आवडतील अशा गाण्यांवर नृत्य सादर करू लागलो,” ते म्हणतात. (तमाशाचा प्रेक्षक म्हणजे बहुतकरून पुरुषच. कधी-कधी काही स्त्रिया येतात, मात्र त्या मागे कोपऱ्यात बसतात.) “तमाशा ही काळानुसार बदलणारी करमणूक करणारी कला आहे. जसं सिनेमा बदलला, तसंच तमाशाही बदलला,” खेडकर पुस्ती जोडतात.

ते जे बदल आणत होते ते इतर फडांनीही बाणवायला सुरुवात केली. पण इथेच माशी शिंकली. खेडकरांना वाटतं की हे बदल अटळ होते, तरी ते म्हणतात, “पूर्वी बाया अंगभर कपड्यात असायच्या आणि प्रेक्षकांना त्या आवडायच्या. पण आता मात्र मुली अगदी तोकड्या आणि उत्तान कपड्यात नाचतात. हे थांबायलाच पाहिजे. आजकालचा प्रेक्षक माझ्या काबूत नाही, माझा काळ गेला आता. आता पुढच्या नव्या पिढीनेच याबद्दल काही तरी करायला पाहिजे. तमाशा संकटात आहे.”

आणि म्हणूनच जेव्हा या कलेवरची त्यांची दृढ श्रद्धा घेऊन, पूर्ण झोकून देऊन मंगलाताई स्टेजवर येतात, आणि जेव्हा दिवे झगमगतात, त्यांचे चमचमते कपडे, मेक अप आणि अदा पाहिल्या की त्या त्यांच्या दुखऱ्या गुडघ्यांमुळे रंगमंचावर जास्त वावरू शकत नाहीत हेही चालून जातं. आणि म्हणूनच आज त्या ६६ वर्षांच्या आहेत आणि कदाचित तमाशाच्या शेवटच्या काही सम्राज्ञींपैकी आहेत याचाही आपल्याला क्षणभर विसर पडतो.

Shatakshi Gawade

शताक्षी गावडे पुण्याच्या स्वतंत्र पत्रकार आहेत. त्या पर्यावरण, अधिकार आणि संस्कृती याबद्दल लिहितात. शताक्षी गावडे यांचे अन्य लेखन

यांचे इतर लिखाण Shatakshi Gawade
Vinaya Kurtkoti

विनया कुर्तकोटी पुण्याच्या स्वतंत्र पत्रकार आणि कॉपी एडिटर आहेत. त्या कला आणि संस्कृतीविषयी लिहितात. विनया कुर्तकोटी यांचे अन्य लेखन

यांचे इतर लिखाण Vinaya Kurtkoti
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे