"आम्हाला पोलिसांनी घरीच राहायला सांगितलं. केंव्हाही किराणा माल किंवा इतर काही गरजेच्या वस्तू आणायला बाहेर पडलो की, पोलीस आम्हाला मार देऊन पळवून लावायचे. रात्री लघवीला जरी बाहेर पडलो, तरी ते आम्हाला लाठी मारायला उभेच," डोला राम मुंबईतील कोविड-१९ टाळेबंदीचे पहिले काही दिवस आठवून सांगतात.
२५ मार्च रोजी सकाळी टाळेबंदीची खबर ऐकून डोला राम आणि त्यांचे कामगार मित्र मालाडमधल्या कामावरून बोरिवलीतल्या खोल्यांमध्ये परत आले. परिस्थिती बदलेल या आशेने ते सहा दिवस आपल्या खोलीत राहिले. ही खोली १५ जणांनी मिळून प्रत्येकी दरमहा रू. १००० भाड्यावर घेतली होती. लवककरच त्यांच्याकडील अन्न संपू लागलं. म्हणून ३७ वर्षीय डोला राम आणि इतर काहींनी राजस्थानातील आपापल्या गावी परतण्याचं ठरवलं.
"मुंबईत कामच नव्हतं. आम्ही होळीनंतर [गावातून] नुकतेच परत आलो होतो त्यामुळे गाठीला फारसे पैसेही नव्हते. शहरात राहण्यात काही अर्थ नव्हता," डोला राम आम्हाला फोनवर सांगतात. शहर सोडण्यापूर्वी त्यांना आपला पाच वर्षांचा मुलगा आजारी असल्याची खबर मिळाली होती. त्यांची बायको सुंदर आणि इतर नातेवाईकांनी त्याला अगोदर दवाखान्यात, नंतर भोपा, अर्थात स्थानिक वैदूकडे नेलं, पण तो बरा होईना.
डोला राम राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील बैरोलियामध्ये (९-१० मार्च रोजी) होळी साजरी करून नुकतेच मुंबईला परतले होते. पोटापाण्यासाठी वर्षातले ८-९ महिने त्यांना सलूंबर तालुक्यातील आपलं गाव सोडून दूर जावं लागतं. गेली १५ वर्षं ते बांधकामाच्या ठिकाणी गवंडी म्हणून काम करतायत आणि कामानिमित्त राजस्थानमधील शहरांमध्ये, किंवा पार गोवा, पुणे आणि गुजरातेत स्थलांतर करतात. गेली दोन वर्षं ते मुंबईला येतायत. डोला राम यांचं अलीकडचं काम म्हणजे मार्बल पॉलिशिंग, ज्यात त्यांना महिन्याला रू. १२,००० मिळायचे, पैकी रू. ७,०००-८,००० ते दर महिन्याला घरी पाठवायचे. ते वर्षातून दोनदा आपल्या घरी जातात – एकदा होळीला आणि एकदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये – आणि दरवेळी १५ ते ३० दिवस राहतात.
मुंबईहून बैरोलियाला अलीकडील प्रवास मात्र त्यांच्यासाठी अनपेक्षित आणि तितकाच खडतर होता. ते आपल्या मित्रांसोबत ३१ मार्च रोजी, टाळेबंदी सुरू झाल्याच्या सहा दिवसांनंतर, मुंबईहून निघाले. "आम्ही १९ जणांनी मिळून रू. २०,००० देऊन राजस्थानमध्ये आमच्या गावी जायला टॅक्सी केली होती. पण पोलिसांनी आम्हाला महाराष्ट्र बॉर्डरहून परत पाठवलं अन् आम्हाला मुंबईत डांबून ठेवलं," ते सांगतात.







