चितेमपल्ली परमेश्वरीला किती तरी वेळा वाटतं, चक्क पळून जावं. “लेकरांना सोडून कसं जावं? त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?” ३० वर्षांची परमेश्वरी म्हणते.

परमेश्वरीच्या नवऱ्याने, चितेमपल्ली कमल चंद्र याने २०१० साली नोव्हेंबर महिन्यात वयाच्या अगदी विशीत आत्महत्या केली. “त्याने चिठ्ठी पण ठेवली नाही. कदाचित त्याला नीटसं लिहिता यायचं नाही म्हणून असेल,” हलकं हसत ती सांगते.

आणि मग शेषाद्री आणि अन्नपूर्णा या आपल्या दोघा मुलांची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. हे दोघंहा आता सरकारी शाळेत शिकतायत आणि घरून ३० किलोमीटरवर असलेल्या एका वसतिगृहात राहतात. “त्यांची फार आठवण येते,” असं म्हणताना तिला भरून येतं. पण स्वतःला सावरत ती म्हणते, “पण त्यांना वेळेवर जेवण मिळतंय. कळतंय मला.”

दर महिन्यात ती एकदा त्यांना भेटून येते. “माझ्याकडे पैसे असले तर मी त्यांना ५०० रुपये देते आणि नसले तर २०० [रुपये] देते,” ती सांगते.

परमेश्वरी माडिगा आहे. तेलंगणात हा समाज अनुसूचित जातीत येतो. ती चिलतमपल्ले गावात एका खोलीच्या घरात राहते. तिच्या घरचं छत दबलंय. घराच्या बाहेर पत्र्याची शेड आहे. चिलतमपल्ले विकाराबाद जिल्ह्यात येतं. हे घर सासरच्यांच्या नावावर आहे. लग्न झाल्यावर परमेश्वरी इथेच रहायला आल्या.

PHOTO • Amrutha Kosuru
PHOTO • Amrutha Kosuru

डावीकडेः परमेश्वरीचा नवरा चितेमपल्ली कमल चंद्रांचा फोटो. २०१० साली त्याने आपलं जीवन संपवलं. उजवीकडेः परमेश्वरी तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्याच्या चिलतमपल्ले गावात एकटी राहते

नवऱ्याच्या आत्महत्येनंतर परमेश्वरीला आसरा पेन्शन योजनेखाली मिळणारं विधवा पेन्शन हीच काय ती तिची नियमित कमाई होती. “२०१९ सालापर्यंत मला १,००० रुपये मिळत होते. आता दर महिन्याला २,०१६ रुपये मिळतात.”

याशिवाय तिच्याच गावात सासरच्यांच्या मालकीच्या मक्याच्या शेतात काम केलं तर महिन्याला २,५०० रुपये मजुरी मिळते. शिवाय ती आसपासच्या परिसरात रोजंदारीवर काही कामं मिळाली तर तीही करते. अधून मधून अशा कामाचे दिवसाला १५०-२०० रुपये मिळतात. अर्थात हे काम मधूनच कधी तरी असतं.

तिची जी काही कमाई आहे ती कुटुंबाच्या महिन्याच्या घरखर्चात संपून जाते. “कधी कधी तर पैसा पुराच पडत नाही,” हाताने पदर मुडपत ती बोलते.

आणि ही कमाई पुरणं अशक्यच आहे कारण तिचा नवरा मरून १३ वर्षं उलटल्यानंतरही त्याने घेतलेली कर्जं फिटलेली नाहीत. दर महिन्याला खाजगी सावकारांचा म्हणजेच अप्पुलोरूंचा हप्ता म्हणजे तिच्यासाठी चिंतेची बाब आहे. “डोक्यावर किती कर्ज आहे तेच माहित नाही,” ती काळजीच्या स्वरात म्हणते.

PHOTO • Amrutha Kosuru
PHOTO • Amrutha Kosuru

परमेश्वरी चिलतमपल्ले गावातल्या आपल्या घरी आपल्या स्वयंपाकघरात (डावीकडे) आणि बाहेर ओसरीवर

कमल चंद्राने काही एकर जमीन खंडाने घेतली होती. आणि तो खर्च भागवण्यासाठी तो कर्ज घेत राहिला. त्याने जीव दिला तोपर्यंत त्याच्या डोक्यावर विकाराबाद जिल्ह्यातल्या पाच वेगवेगळ्या अप्पुलोरूंकडून घेतलेलं सहा लाखांचं कर्ज होतं. “मला फक्त तीन लाखांचं माहित होतं. एवढी मोठी रक्कम असेल याची मला कल्पनाच नव्हती,” परमेश्वरी सांगते.

तिचा नवरा वारला त्यानंतर काही आठवड्यांतच या सावकारांनी तिला गाठलं आणि तेव्हा तिला समजलं की त्याने दोघांकडून प्रत्येकी १.५ लाख आणि तिघांकडून एकेक लाख रुपये कर्ज घेतलं होतं. आणि या सगळ्यांचा दर साल व्याजाचा दर ३६ टक्के होता. कसलीच लिखापढी केलेली नसल्याने या कर्जांचा नेमका हिशोब परमेश्वरींपाशी नव्हता.

“मी पैसे भरले कि मिळाल्याचं त्यांनी मला कळवावं इतकीच खात्री ठेवू शकते,” ती म्हणते. गेल्या महिन्यात तिने एका अप्पुलोरूला अजून किती कर्ज बाकी आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने धड काही उत्तर दिलं नाही आणि आजही तशी ती अंधारातच आहे.

तिला दर महिन्यात प्रत्येक सावकाराला २,००० रुपये हप्ता द्यावा लागतो. एकाच वेळी एवढे पैसे देणं शक्य होत नसल्याने ती महिन्यातल्या वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकाचे पैसे भरते. “प्रत्येक महिन्यात प्रत्येकाचा पूर्ण हप्ता भरण्याइतके पैसे काही माझ्यापाशी नसतात,” ती सांगते. कधी कधी ती काही सावकारांना फक्त ५०० रुपयेच देऊ शकत असल्याचं तिच्याकडून कळतं.

PHOTO • Amrutha Kosuru
PHOTO • Amrutha Kosuru

डावीकडेः परमेश्वरीच्या कुटुंबाचा जुना फोटो. उजवीकडेः परमेश्वरी सासरच्यांच्या शेतात काम करते आणि कर्जं चुकती करण्यासाठी रोजंदारीवर कामं करते

“त्याने जे काही केलं त्यासाठी मी त्याला बोल लावत नाही. मला समजतंय,” परमेश्वरी म्हणते, “माझ्याही मनात तसा विचार येऊन जातो, कधी कधी. सगळ्याला एकटीनेच तोंड द्यायचंय.”

कधी कधी मनावरचा ताण फार वाढतो. अशा वेळी मुलांचा विचार केल्यावर जरा निवळतो. “मग काय अप्पुलोरू माझ्या लेकरांना कर्जं फेडायला लावतील,” ती दुःखी होत म्हणते. “त्यांनी का बरं फेडायचं? त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन मोठ्या शहरात चांगल्या जागी नोकऱ्या कराव्या असं वाटतंय मला.”

*****

परमेश्वरीचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू होतो. “घरात तांदूळ असला तर मी तो शिजायला घालते. नाही तर मग गंजी करायची,” ती म्हणते. ज्या दिवशी कामाला जायचं असतं त्या दिवशी डबा भरून सकाळी ८ वाजता ती घर सोडते.

एरवीच्या दिवशी ती घरकामं उरकते आणि मग उरलेल्या वेळात आपल्या छोट्याशा टीव्हीवर जुने, कृष्णधवल तेलुगु सिनेमे किंवा मालिका पाहते. “मला सिनेमा पहायला आवडतं. पण कधी कधी वाटतं [केबल कनेक्शन] बंद करावं.” पण मन उदास असलं की त्यावर जरा उतारा म्हणून हा २५० रुपयांचा खर्च केलेला परवडला.

PHOTO • Amrutha Kosuru
PHOTO • Amrutha Kosuru

परमेश्वरीला टीव्हीवर जुने कृष्णधवल तेलुगु सिनेमे आणि मालिका पहायला आवडतं. आपल्या अडचणी दुसऱ्या कुणाला सांगितल्या तर बरं वाटतं असं ती म्हणते

२०२२ साली ऑक्टोबर महिन्यात तिला कुणी तरी सुचवलं की ग्रामीण भागातल्या ताणतणावाविषयी काम करणाऱ्या किसानमित्र या हेल्पलाइनला फोन कर. “एका बाईने फोन उचलला. तिच्याशी बोलल्यावर मला खरंच बरं वाटलं. परिस्थिती सुधारेल असं ती म्हणाली,” परमेश्वरी सांगते. ही हेल्पलाइन तेलंगण आणि आंध्र प्रदेशात कार्यरत असलेल्या रुरल डेव्हलपमेंट सर्विस सोसायटीतर्फे चालवली जाते. त्यांचा फोन झाल्यानंतर थोड्याच दिवसांत किसानमित्रचे क्षेत्र समन्वयक जे. नरसिमुलु परमेश्वरीच्या घरी आले. “त्यांनी मला माझा नवरा, मुलं, आर्थिक अडचणी अशा गोष्टींबद्दल विचारलं,” ती सांगते.

जरा चार पैसे जास्त मिळतील म्हणून परमेश्वरी आता एक गाय विकत घेणार आहे. “ती आली की एकटेपणा जरा कमी होईल.” तिने खरेदीचे १०,००० रुपये इसार भरले आहेत. “गाय अजून घरी यायची आहे, पण मी तिची खरंच वाट पाहतीये,” ती म्हणते.

जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमच्या ओळखीचं कुणी तणावाखाली असेल तर किरण या राष्ट्रीय हेल्पलाइन शी संपर्क साधा – १८००-५९९-००१९ (२४ तास, टोल फ्री) किंवा तुमच्या जवळच्या यापैकी कोणत्याही हेल्पलाइनशी संपर्क साधा. मानसिक आरोग्यासाठी सेवा आणि सेवादात्यांची माहिती हवी असल्यास, एसपीआयएफ ने तयार केलेल्या या सूचीची अवश्य मदत घ्या.

या वार्तांकनासाठी रंग दे कडून अर्थसहाय्य मिळालं आहे.

Amrutha Kosuru

अमृता कोसुरु २०२२ वर्षाची पारी फेलो आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी घेतली असून ती विशाखापटणमची रहिवासी असून तिथूनच वार्तांकन करते.

यांचे इतर लिखाण Amrutha Kosuru
Editor : Sanviti Iyer

Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.

यांचे इतर लिखाण Sanviti Iyer