भाटवडगावच्या शिवाराशेजारनं कच्च्या सडकेनं चालत आम्ही एका छोट्याशा घरी येऊन पोचलो. सपाट सीमेंटचं छत आणि भिंतींना गुलाबीसर रंग. घराचं नाव काहीसं न्यारं – ठिणगी. गडद जांभळ्या रंगात भिंतीवर रंगवलेलं, सहसा घरांना न दिलं गेलेलं नाव. त्याच नावाचा ८-१० कवनांचा संग्रहदेखील आहे. “इतरही गीतं आहेत,” प्रदीप साळवे आम्हाला सांगत होते. “माझ्या वडलांची गीतं लिहिलेली नाहीत, पण माझ्या स्मृतीत जतन केली आहेत.”
प्रदीप आमच्याशी त्यांचे वडील, शाहीर आत्माराम साळवेंच्या थोर वारशाबद्दल बोलत होते. शाहीर साळव्यांनी ३०० कविता रचल्या आहेत. “हुंडा बंदी, दारू आणि तिच्या घातक परिणामांबद्दल आहेत ही गीतं,” त्यांनी सागितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित, स्त्रिया, शेती, शिक्षण आणि सामाजिक क्रांतीबद्दलही त्यांनी कवनं रचली आहेत. शाहिरांच्या ठिणगी या घराशेजारी (जिथे आता त्यांचा दुसरा मुलगा दीपक राहतो) असलेल्या राजरत्न या आपल्या घरी त्यांनी शाहिरांच्या हुंडाविरोधी कवितेतील एक ओळ उद्धृत केलीः
“हुंड्याची पद्धत सोडा, समतेशी नाते जोडा”
आम्ही बीडच्या माजलगावमध्ये होतो. जात्यावरच्या ओव्या या प्रकल्पाअंतर्गत २१ वर्षांपूर्वी इथे ज्या स्त्रियांच्या ओव्या ध्वनीमुद्रित केल्या होत्या त्यांना भेटायला आम्ही आलो होतो. या ओव्या आता पारीवर क्रमाने प्रसिद्ध होत आहेत.





