बेस कॅम्पवर परत नवीन आशा निर्माण झाली होती, आणि चिंताही. हिरव्या गणवेशातल्या महिला आणि पुरुष सतत त्यांच्या मोबाइल फोनवर येणाऱ्या संदेशांवर, नकाशांवर आणि फोटोंवर लक्ष ठेऊन होते.
त्या दिवशी सकाळी, जवळच्याच जंगलात वाघिणीच्या मागावर असणाऱ्या गटाला पंजाचे ताजे ठसे सापडले होते.
दुसऱ्या गटाने वाघाची अंधुकशी छबी सादर केल्याचं वन खात्याच्या सूत्रांनी सांगितलं. पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं पानगळीच्या झुडपांचं जंगल, अधून मधून कपाशीची रानं आणि तलाव. त्यात बसवलेल्या ९० कॅमेऱ्यांमधल्या एका कॅमेऱ्यात वाघाची छबी पकडली गेली होती. “पट्टे तरी वाघिणीसारखे दिसतायत,” हिरवा गणवेश घातलेला एक तरूण वन अधिकारी म्हणतो, त्याच्या आवाजातला तणाव लपत नाही. “पण छबी स्पष्ट नाहीये,” त्याचे वरिष्ठ म्हणतात, “अजून स्पष्ट दिसायला पाहिजे.”
ही तीच असेल का? ती जवळपास आली असेल का?
गेली दोन वर्षं आपल्या दोन बछड्यांसोबत वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या या वाघिणीच्या शोधात वन संरक्षक, तिचा माग काढणारे आणि निशाणेबाज पुन्हा एकदा जंगलात वेगवेगळ्या दिशेने आगेकूच करायला सज्ज झाले आहेत.
किमान १३ गावकरी वाघाच्या हल्ल्यात मरण पावले आहेत – सगळ्या प्रकरणात संशयाची सुई मात्र तिच्यावरच आहे.
वन्यजीव निरीक्षकाच्या आदेशानुसार या वाघिणीला ‘पकडा किंवा ठार करा’ म्हणून मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. पण यातला कोणताच पर्याय सोपा नव्हता. २८ ऑगस्ट २०१८ पासून तिचा काहीच मागमूस लागत नव्हता. कॅमेऱ्याचा बारीकसा आवाज किंवा पंजाचे ठसे दिसले की या वाघिणीचा माग काढणाऱ्या आणि तिला जेरबंद करू पाहणाऱ्या गटाच्या आशा पल्लवित व्हायच्या.











