किमान १३ जणांचा गेल्या दोन वर्षांत जीव गेला आहे, कदाचित १५ जणांचा. अनेक गायी-गुरांचा फडशा पडला आहे. आणि हे सगळं घडलंय यवतमाळ जिल्ह्यातल्या ५० चौरस किमी क्षेत्रात. शेतकरी आत्महत्या आणि कृषी संकटामुळे हा जिल्हा तसाही बदनाम आहेच. गेल्या आठवड्यापर्यंत यवतमाळच्या राळेगावमध्ये एक वाघीण तिच्या दोन पिल्लांसह वावरत होती आणि गावकरी व वन खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. जवळ जवळ ५० गावांमध्ये शेतीची कामं थंडावली होती. शेतमजूर एकट्याने रानात जायला राजी नव्हते, गेलेच तर गटाने, एकत्र.
“तिचा बंदोबस्त करा,” सगळीकडे एकच मागणी.
वाढता जनक्षोभ आणि लोकांच्या दबावामुळे वन खात्याचे अधिकारी पुरते गांगरून गेले होते. काहीही करून टी १ किंवा अवनी वाघिणीला जेरबंद किंवा ठार करायचं होतं. यातून एक मोठी क्लिष्ट मोहीम सुरू झाली, २०० वन रक्षक, वाघाचा माग काढणारे, निशाणेबाज, महाराष्ट्र वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मध्य भारतातले अनेक तज्ज्ञ यात सहभागी झाले. सगळ्यांनी अहोरात्र या भागात तळ ठोकला आणि अखेर २ नोव्हेंबर रोजी टी १ ला मारण्यात आलं आणि ही मोहीम संपली. (पहा, टी १ वाघिणीच्या राज्यातः एका हत्येची चित्तरकथा)
तोपर्यंत, २०१६ पासून आजपर्यंत या वाघिणीने अनेकांचा जीव घेतला आहे. नकळत तिच्या हल्ल्यात बळी पडलेले हे नक्की होते तरी कोण?








