जग सध्या एका कठीण काळातून जात आहे. आपल्यातल्याच काही जणांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे आपल्या घरात बंद झालो होतो त्याच वेळी शेकडो, हजारो, लाखो लोक शेकडो मैल दूर असलेल्या त्यांच्या गावाकडे पायी निघतील, असं आपल्याला अजिबात वाटलं नव्हतं. या प्रकाराने मी खूप दुःखी झालो. आपल्या विकसित देशात, महान देशात, अनेक बाबतीत अग्रेसर होण्याचा दावा करणाऱ्या या देशात कोट्यवधी लोक केवळ आसर्यासाठी, आपल्या घरी पोचण्यासाठी शेकडो मैल चालत जातात, या गोष्टीने मी अस्वस्थ झालो.
‘घरात राहा’? किती लोकांकडे घर आहे इथे? शेकडो किलोमीटर चालता चालता त्यातल्या काहींचा मृत्यू झाला. ती पावलं, ती मुलं... त्यांची चित्रं पाहिली तेव्हा माझं दुःख व्यक्त करावंसं वाटलं मला. मला नाही वाटत हे आपल्याच देशापुरतं सीमित आहे. संपूर्ण जगच या संकटाचा सामना करतंय. अनेक जण फक्त कोरोनाचा विचार करत होते, इतर माणसं त्यांच्या खिजगणतीतही नव्हती... अशा वेळी दूरवर स्थलांतर करणार्या मजुरांचं दुःख मला मांडायचं होतं. या दुःखातूनच या गाण्याचा जन्म झाला आहे.
जग पाहू इच्छिणार्या, जगभर फिरण्याची आस असणार्या मनाचा मी प्रवासी आहे. माणसांबद्दल मला विलक्षण प्रेम आहे, त्यांची आयुष्यं मन:चक्षुंसमोर आणण्याचा मी प्रयत्न करत असतो. हे गीत या दोन्ही गोष्टींच्या मिलाफातून उतरलं आहे...



