"एरवी मी माझ्या सायकलवर ४०-५० किमी चालत प्लास्टिकच्या बादल्या आणि भांडी विकत असतो," ए. शिवकुमार सांगतो. नागपट्टिणम जिल्ह्यातील आरासुर या आदिवासी पाड्यात राहणाऱ्याया ३३ वर्षीय शिवकुमारचा रोजचा दिवस पहाटे ५:०० ला सुरु होत असे. एका विशेष सायकलवर स्वार होऊन, सायकलवर रंगीबेरंगी प्लास्टिकच्या वस्तू टांगून ते निघतात. त्यांचा उदरनिर्वाह यांच्या विक्रीतून होतो. एरवी ३००-४०० रुपयांचा नफा होत असल्याचं तो सांगतो – जेमतेम आपल्या घरातल्या सहा सदस्यांचं पोट भरण्यापुरता.
पण हे काही एरवीचे दिवस नाहीत.
टाळेबंदीमुळे मात्र त्याचं हे काम थांबलंय – आणि सोबतच, त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत. पण शिवकुमार यांना कोविड-१९ च्या काळ्या ढगांमध्ये आशेचा एक किरण सापडला. "वनविल नसतं ना," ते म्हणतात, "तर आम्ही उपाशीच राहिलो असतो."
वनविल म्हणजे तमिळ भाषेत इंद्रधनुष्य. जिल्ह्यातल्या नागपट्टिणम तालुक्याच्या सिक्कल गावातल्या प्राथमिक शाळेचं नाव आहे वनविल. २१ एप्रिलपर्यंत ४४ लोक कोरोनाबाधित झाल्याने नागपट्टिणम तमिळनाडूतील कोविड-१९ हॉटस्पॉट पैकी एक आहे.
ही शाळा प्रामुख्याने भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि सध्या – वर्ग बंद असले तरी - आरासुर आणि आसपासच्या गावातील कुटुंबांसाठी किराण्याची व्यवस्था करत आहे. लॉकडाऊनचा प्रभाव वाढायला लागला आणि शाळेने मदत पुरवलेल्या कुटुंबांची संख्या १,२२८ वर पोहोचली – यातली जवळपास १,००० कुटुंबं अत्यंत मागासलेल्या गटातून आहेत. येथील हजारो गरिबांसाठी ही शाळाच त्यांच्या अन्नसुरक्षेचा आधार आहे.










