या महामारीने आपली वाटणी क्षेत्र आणि केंद्रांमध्ये केलीये. शारीरिक अंतर पाळण्याच्या सूचनांनी लोकांमध्ये सामाजिक दुरावा निर्माण केलाय. आता संपर्क आणि दुव्यांची भीती वाटायला लागलीये. सगळ्या माध्यमांमध्ये आपल्याला एकच दृश्य दिसतंय, वाट पाहून थकलेले उपाशी असलेले स्थलांतरित कामगार कसंही करून भारताच्या गावखेड्यांमध्ये असलेल्या आपल्या घरी पोचण्यासाठी शेकडो किलोमीटर चालत निघालेत. खिशात पैसा नाही, पोटात अन्नाचा घास नाही तरी लाठीमार आणि आडकाठ्या सहन करत जात राहिलेत – त्यांची स्थिती पाहून वाटतं, कुठेही माणुसकीचा अंशही राहिला नाहीये.
आणि तितक्यात तुम्हाला दिसतो मे महिन्याच्या उन्हाच्या कारात महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातल्या आपल्या गावी निघालेला आपल्या म्हाताऱ्या मावशीला कडेवर घेऊन निघालेला तिचा भाचा. हा माणूस आहे का यक्ष? एरवी देखील घरच्या म्हाताऱ्यांना जत्रांमध्ये, वृंदावनच्या वृद्धाश्रमांमध्ये सोडून येणारे लोक आहेतच. आपली मुलं त्यांच्या करियर आणि आयुष्यांच्या मागे दूर उडून गेल्यावर सुखवस्तू पालकही एकटे राहतातच. त्या सगळ्या नेहमीच्या चित्रात हा माणूस काही बसत नाही. गरिबी आणि अवहेलनेतही अजून माणुसकी शिल्लक आहे हे सांगणारा यक्ष आहे तो.
टीपः स्थलांतरित कामगार असणारे विश्वनाथ शिंदे त्यांच्या मावशीला, बचेला बाईला कडेवर घेऊन नवी मुंबईहून विदर्भातल्या अकोल्याच्या दिशेने मुंबई-नाशिक महामार्गावरून चालत निघाले होते. लाबोनी जांगी हिने ४ मे २०२० रोजी प्राइम टाइम विध रवीश कुमार (एनडीटीव्ही इंडिया) या कार्यक्रमात सोहित मिश्रांच्या एका वृत्तात हे दृश्य पाहिलं. लाबोनीने व्यक्त केलेले विचार स्मिता खातोरने अनुवादित केले आहेत.
अनुवादः मेधा काळे