बुधा नेपाळहून इथे स्थलांतरित झाला आहे. तो गेल्या दीड वर्षापासून बिहारशरीफच्या मदरसा अझिझियामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो आहे. “मी त्यांना हे थांबवायची विनंती केली तर त्यांनी माझ्याच अंगावर यायला लागले. गुद्दे मारून ते म्हणाले, ‘साला नेपाली, भागो यहां से, नही तो मार देंगे’.”
३१ मार्च २०२३ रोजी शहरात काढलेल्या राम नवमीच्या शोभायात्रेदरम्यान दंगलखोरांनी इस्लामचं शिक्षण देणाऱ्या आणि वाचनालय असलेल्या मदरसाला आग लावली तेव्हाचे प्रसंग तो सांगतोय.
“लायब्ररीत आता काहीही राहिलेलं नाहीये,” बुधा म्हणतो. “आता त्यांना सुरक्षारक्षकाची गरजच नाहीये. माझं काम सुटलं.”
पारीने एप्रिल २०२३ मध्ये मदरशाला भेट दिली. बिहारच्या नालंदा जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या बिहारशरीफ गावातल्या फक्त या मदरशावर नाही तर अनेक प्रार्थनास्थळांवर दंगलखोरांनी हल्ला केला होता. सुरुवातीला शहरात कलम १४४ खाली संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आलं. एक आठवड्यानंतर दोन्ही उठवण्यात आलं.
याच मदरशातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले सईद जमाल सुन्नपणे तिथे फिरत होते. “या वाचनालयात किती सारी पुस्तकं होती, पण मी काही ती सगळी वाचू शकलो नव्हतो,” ते म्हणतात. १९७० मध्ये ते तिसरीत या मदरशात दाखल झाले आणि आलिम होऊन (पदवीधर) इथून बाहेर पडले.
“काही तरी राहिलंय का ते पहायला मी आलोय,” हसन सांगतात.