उत्तराखंड राज्यातील चंपावत जिल्ह्यातील गडयूडा गावात राहणारे धारी राम काठीच्या आधाराने लडत खडत चालत आहेत. या पर्वतांवरच्या प्रखर उन्हामुळे त्यांनी डोळे मिचकावले असून कपाळावरही आठ्या आल्या आहेत. त्यांना हर्निया झाला आहे आणि उपचाराकरिता त्यांना १५० किमी दूर तनकपूर नाही तर त्याहूनही दूर असलेल्या हल्द्वानी येथील सरकारी इस्पितळात जावं लागेल. पण त्यांच्याकडे उपचाराकरिता पैसे नाहीत.
“मी महिन्याला एक रुपयादेखील कमवू शकत नाही,” ते म्हणतात. पूर्वी ते मजुरी आणि दगड फोडायचं काम करत असत. गेली सात वर्षे राज्य शासनाकडून त्यांना मासिक १००० रुपये पेन्शन मिळते. ६७ वर्षांचे धारी राम त्यात आपल्या गरजा भागवत असत. मात्र ऑक्टोबर २०१६ पासून त्यांच्या बँक खात्यात ही बहुमूल्य रक्कम जमा होणं बंद झालं हे. कारण, ज्या लाभार्थींनी समाज कल्याण विभागात आपल्या आधार कार्डाचे तपशील दिले नाहीत, त्यांना राज्य शासनाने पेन्शन सुविधा देणं बंद केलं.
एप्रिल २०१७ मध्ये धारी राम गावापासून ६५ किमी दूर असलेल्या चंपावत तालुक्यात समाज कल्याण विभागात आपली नोंदणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेलं तीन वर्षांपूर्वी काढलेलं आधार कार्ड देखील आहे. भिंगराडा येथे आसपासच्या १० गावांकरिता उघडण्यात आलेल्या खाजगी केंद्रातून त्यांनी हे कार्ड काढलं होतं. मात्र, या कार्डावर त्यांचं नाव “धनी राम” असं छापलं गेलं असून ते समाज कल्याण खात्यातील नावाशी जुळत नसल्याने त्यांना मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली आहे.








