मंगळवारच्या पावसानं मुंबईचं शिवाजी पार्क चिखलानं भरून गेलं होतं, सगळंच निसरडं, अगदी पाऊलही ठरत नव्हतं. सखुबाई खोरे घसरून पडल्या आणि त्यांच्या पायाला इजाही झाली. तरीही बोळकं भरून हासणाऱ्या सखुबाई म्हणतात, “मी माझ्या देवाच्या पाया पडाया आलीये. मला जमतंय तोवर मी येतच राहणार. हात पाय चालू आहेत तोवर मी येणार, माझ्या डोळ्याला दिसतंय तोवर मी येतच राहणार.”
त्यांचा देव – इथे जमलेल्या जनसागरातल्या जवळ जवळ प्रत्येकाचाच देव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि सत्तरीच्या नवबौद्ध असणाऱ्या सखुबाई ६ डिसेंबरला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी जळगावच्या भुसावळमधून त्यांना अभिवादन करायला आल्या आहेत.
दर वर्षा याच दिवशी शिवाजी पार्क आणि दादरच्या चैत्यभूमीवर दलित समाजाचा प्रचंड मोठा जनसागर गोळा होतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेडकरांचं दहन चैत्यभूमीवर झाल्याने ते त्यांचं स्मारक मानलं जातं. विसाव्या शतकातले महान समाजसुधारक आणि सर्वच दलितांचा आवाज म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. या दिवशी मुबंईत पोचण्याकरिता त्यांचे अनुयायी रेल्वेने येतात, बस पकडतात किंवा मैल न् मैल पायी येतात. मुंबईतले, महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातले आणि इतरही राज्यातले हे अनुयायी अनेक दिवसांचा प्रवास करून इथे पोचतात. मनात केवळ आदर, कृतज्ञता आणि निखळ प्रेम.












