त्याच्या वर्कशॉपवर कसलीही पाटी नाही. “यह तो एक गुमनाम दुकान है,” तो म्हणतो. त्या ८ फूट बाय ८ फुटाच्या शेडच्या आत बघावं तर सगळ्या ऍसबेसटॉसच्या भिंती काजळी आणि जळमटांनी भरून गेल्या आहेत. एका कोपऱ्यात चिखलमातीची आणि लोखंडाची मातीची भट्टी दिसते. खोलीच्या मध्यावरचा जळलेल्या काळ्या मातीचा ढिगारा निळ्या ताडपत्रीनं झाकला आहे.
दररोज सकाळी सात वाजले की, हैद्राबादच्या पश्चिमेकडच्या दूध बावलीच्या अरुंद गल्ल्यांमधून सायकल मारत अझीम वर्कशॉपमधे येतो. त्याच्या वर्कशॉपची मागची भिंत हकीम मीर वजीर अलीच्या कब्रस्तानच्या कुंपणामधे मिसळून गेली आहे.
प्लास्टिकचे धुळकट डबे, गंजलेले धातूचे डबे, तुटक्या बादल्या आणि जमिनीवर सगळीकडे पसरलेली हत्यारं आणि पंच (ठसे) या सगळ्याच्या मधे तो रोजचं काम सुरु करतो. ही जागा काम करण्यासाठीही पुरेशी नाही. तो इथे वाळूच्या साच्यांमधे धातूचे बिल्ले तयार करतो.
अठठावीस वर्षांच्या अझीमनं केलेली ही टोकन हैद्राबादमधली मोजकी चहाची दुकानं,उपाहारगृहं आणि भोजनालयं अजूनही वापरतात. पूर्वी गिरण्या, लष्कराशी संबंधित दुकानं, रेल्वे, बँका,क्लब, सहकारी भांडार आणि इतर अनेक ठिकाणी यासारखी कँटीन टोकन वापरली जायची. पण जसजसा काळ गेला आणि लोक प्लास्टिकचं टोकन किंवा कागदी पावती जास्त वापरायला लागले, तशी धातूच्या टोकनची मागणी कमी कमी होत गेली. हैद्राबादमधल्या काही भोजनालयात यांचा उपयोग दिवसाच्या मिळकतीचा हिशोब करायला होतो. गिऱ्हाईकांनी एखादा पदार्थ मागितला की त्यांना त्याचं टोकन देतात.
घरी आणि इतर दुकानदारांमध्ये अझीमला सगळे अझू म्हणतात. तर अझूच्या अंदाजाप्रमाणे, तो टोकनचं ओतकाम करणाऱ्या या शहरातल्या शेवटच्या कारागिरांपैकी एक आहे. अख्ख्या हैद्राबादमधे असे दहापेक्षा कमी कारागीर असावेत.



















