जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हशीचं २ महिन्यांचं रेडकू मरण पावलं आणि सारिका सावंतसमोर नवीनच संकट आ वासून उभं राहिलं. “मक्यात मोठी अळी होती बहुतेक, तीच पोटात गेल्याने मेलं बिचारं. कालपासून म्हशीचं दूधच बंद झालंय,” म्हसवडच्या चारा छावणीत आम्ही तिच्याशी बोलत असताना ती सांगते.
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास झेपेना गेलं म्हणून सारिका आणि तिचा नवरा अनिल सावंत यांनी दोन गायी विकल्या आणि आता रेडकू गेलं. सावंत कुटुंबियांकडे सध्या चार जर्सी गायी, तीन म्हशी आणि दोन वासरं आहेत. त्यांचं मुख्य उत्पन्न दुधातनंच. पण, सारिका सांगते, “गेली दोन वर्षं पाऊसच नाही, आणि गेल्या दिवाळीपासून गावातल्या विहिरी आटल्या, माणसाला प्यायला पुरेसं पाणी नाही. कडबा नाही, हिरवा चारा नाही. जनावरं कशी सांभाळावी? डोक्यावरचं कर्ज तर वाढतच चाललं होतं...”
कर्जाचं ओझं वाढायला लागलं आणि अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सारिका, वय २४ आणि तिचा नवरा अनिल, वय ३२, हवालदारवाडीहून १५ किमीवरच्या म्हसवडमधल्या चारा छावणीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातलं ९९४ वस्ती असलेलं हवालदार वाडी हे त्यांचं गाव.
३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, यातल्या ११२ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झाला. माणदेशात मोडणारे सर्व तालुके - सातारा जिल्ह्यातील माण व खटाव, जत, आटपाडी व कवठेमहांकाळ आणि सोलापूर जिल्ह्यातले सांगोला आणि माळशिरस – या यादीत आहेत. माणदेशी फौंडेशनने म्हसवड इथे सुरू केलेल्या चारा छावणीत माणदेशातल्या ६४ गावांमधली २५०० माणसं आणि ८,००० जनावरं आश्रयाला आली आहेत. (पहाः चाऱ्याच्या शोधात कुटुंबांची ताटातूट आणि अखेर चिमणाबाई जेवली, तेही ८००० जणांसोबत)








