सावित्रा उभेंनी गायलेल्या रोजच्या दळणावरच्या ११ ओव्या इथे सादर करत आहोत. दळण दळतानाच्या काही युक्त्या सांगत असतानाच आपल्या आईने अशा कष्टाच्या कामासाठी आपल्याला कसं तयार केलं याचीही आठवण त्या ठेवतात.
“बंधुला विडा दे गं, राधिका बाई. सख्याला विडा दे गं, राधिका बाई,” रुसलेल्या जिवलगाचा राग घालवण्यासाठी जाणती स्त्री जात्यावर दळता दळता आपल्या मैत्रिणीला सांगतीये. ओवीचा गळा गाताना सावित्रा उभेंचे शब्द ढोलावर थाप पडावी असे जोरकस आणि तालात ऐकू येतातः
जाईचं झाड, कळीचा भार,
तोडिती नार, गुंफिती हार.
सुरत अनिवार, चंद्राची कोर.
झाडावरिला राघू, बोलंना काही
वनाच्या ठायी, पानी का नाही.
बंधुला इडा दे गं, राधिका बाई.
सख्याला इडा दे गं,
राधिका बाई.
कळीभरल्या जाईच्या झाडाच्या कळ्या नारीने तोडून त्याचा गजरा केलाय. तिने तो केसात माळलाय की आपल्या सख्यासाठी गुंफलाय? तिचं रुप चंद्रकोरीप्रमाणे अमाप सुंदर दिसतंय. झाडावरचा राघू मात्र बोलत नाहीये. त्याची समजूत काढण्याची खटपट सुरू आहे. हा राघू म्हणजे सखा, पुरुष.
'वनाच्या ठायी पानी का नाही' म्हणजे इतका सुंदर सभोवताल असूनही तृप्ती नाही. कोण जाणे, त्यांचं भांडण झालं असावं आणि तो रुसून बसला असेल. त्याची मनधरणी करण्याची पाळी आता तिच्यावर आली असणार. विडा देऊन त्याला राजी करता येईल कदाचित. दुसऱ्या एका ओवीत भावा-बहिणीमधल्या अशाच एका रुसव्याविषयी सावित्राबाई गातात. ती नारी हीच असेल का? पहाः बहिणीच्या डोळा पाणी, भाऊ चिंतावला मनी
आपल्या पुरुषाला विडा देणं म्हणजे त्याची समजूत काढणं, प्रेम व्यक्त करणं. लोककथा आणि लोककाव्यात विडा शृंगाराचं प्रतीक म्हणून वापरला जातो.
सावित्राबाई आपल्या खास शैलीत प्रत्येक ओळीनंतर गळा गातात. पण बाकीच्या बाया मात्र कुरकुर करतात की गळा फारच मोठा आहे. “दोन ओळीत इतके शब्द ध्यानात राहत नाहीत,” त्या लाडीकपणे नाराजी व्यक्त करतात.
बाकीच्या बाया मजेत गप्पा मारतायत, हसतायत आणि सावित्राबाईंचंही त्यांंच्याकडे लक्ष नाही असं काही नाही. पण त्या गात राहतात. पहिल्या दोन ओव्यांनंतर त्या गळा बदलतात आणि लांब असलेला पण कानाला गोड लागणारा गळा मात्र गायचं सोडून देतात.
या ओव्यांमध्ये जात्यावर दळताना स्त्रियांना किती कष्ट पडतात आणि हे किती ताकदीचं काम आहे याचं वर्णन केलं आहे. जातं नाही तर पर्वतच हलवण्यासारखं हे काम असल्याचं त्या गातात. हा काळा पत्थर खंडीच्या खंडी धान्य दळतो. पती, लेक, मुलगा आणि सून अशा आपल्या भरलेल्या घराला पुरेल एवढं धान्य हे जातं दळतं. स्त्रियांच्या कष्टामुळे घरादाराला सुख समृद्धी मिळते असं सूचित करणारी ओवी म्हणजे – सासू सुना दळतात, सात खणाच्या माडीमधी. सात खणांची माडी असणारं घर त्यांच्या श्रीमंतीचं प्रतीक आहे.
दळणाचं काम करणाऱ्या या बाया ताकदीच्या आहेत. जातं हा जणू काही दोन चाकांचा रथ आहे आणि त्या हा रथ ओढून नेतायत. जाणती स्त्री आपल्या लेकीला म्हणते की ती जातं ओढायला असं हल्यासारखं बसू नये. आपल्या ज्वानीचा सगळा भर लावला तर मात्र जात्याचा रथ दोघींमधून “पाण्यावानी” सहज ओढला जाईल.
जात्यावरची दळणं म्हणजे कष्टाचं काम. दळण आणि कांडण करून तिचे हात पिवळे पडलेत. घामाने अंग भिजून गेलंय. पण इतकं जड कामही तिला जमतंय ही तिच्या आईच्या दुधाची किमया आहे. आईनं पाजलेलं मधासारखं गोड दूध आणि जायफळाच्या गुटीमुळे ही ताकद तिच्यामध्ये आलीये.
सावित्राबाई उभेंनी जात्यावरच्या ओव्या संग्रहासाठी एकूण २३ ओव्या गायल्या आहेत. इथे सादर केलेल्या ओव्यांमध्ये शेवटी त्या दळणाविषयी काही खास युक्त्या नव्या मुलींना सांगतात. त्या म्हणतात दळत असताना अख्खं अंग काही हलवावं लागत नाही. “जात्याचा खुंटा आपल्या मनगटाशी तोलला” की झालं.
सरिलं दळयाण, मला आणिक घेणं आलं
बाळा गं ह्यानी माझ्या,
बाप लेकानी येणं केलं
असं दळण दळीतं, सूप भरुनी दळयातं
आता ना गं माझा राघू, शाळेला गं जायायाचा
जातं काही नव्हं, डोंगरीचा गं परबतु
खंड्याच्या खंड्या दळी,
बाळ माझा संबरतु
असं दोन बायकाचा रथ, कुणाच्या गं वाड्यामधी
अशा दळितात सासू सुना, सात खणाच्या गं माडीमधी
असं जातं काही नव्हं,
डोंगरीचा परबतु
खंड्याच्या खंड्या दळी,
बाळ माझा गं संबरतु
असं जातं काही नव्हं, काळा कुरुंद गं खाणियीचा
अशा गवळण माझ्या बाई,
भर आपल्या ज्वानीचा
असं जातं वढायाला,
काय बसावं हल्यावाणी
असं दोघींच्या मधून,
रथ चालला पाण्यावाणी
असं जातं ना वढावं,
नखा बोटाच्या आगयळी
असं बयाचं पेले दूध,
जसं मधीच्या सागायळी
असं दळता कांडतानी गं,
घाम गळतो वाटीलोटी
अशी बयानी दिली घुटी गं,
जायफळाची मुठीमुठी
अशी दळता कांडतानी गं,
माझी तळहात पिवयाळी
अशी बयानी दिली गुटी गं,
जायफळाची कवयाळी
अगं असं जातं ना वढावं,
अंग कशाला हलायावं
अशी दळ ना माझ्या बाई,
खुटा मनगटी तोलायावं
गळा
जाईचं झाड, कळीचा भार,
तोडिती नार, गुंफिती हार.
सुरत अनिवार, चंद्राची कोर.
झाडावरिला राघू, बोलंना काही
वनाच्या ठायी, पानी का नाही.
बंधुला इडा दे गं,
राधिका बाई.
सख्याला इडा दे गं,
राधिका बाई.
कलावंत – सावित्राबाई उभे
वाडी – खडकवाडी
गाव - कोळावडे
तालुका – मुळशी
जिल्हा – पुणे
जात – मराठा
दिनांक – या ओव्या १ जून १९९६ रोजी रेकॉर्ड केल्या आहेत.
पोस्टर – ऊर्जासावित्रा उभे यांनी गायलेल्या आणखी काही ओव्या ऐकाः संसाराच्या सुखासाठी बाईचं काम आणि घाम आणि बहिणीच्या डोळा पाणी, भाऊ चिंतावला मनी
हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.