मोडलेल्या हाताला प्लास्टर घातलं होतं आणि तो हात झोळी करून गळ्यात अडकवला होता. नारायण गायकवाड त्यामुळे अस्वस्थ होते. त्यांनी ती झोळी काढली. डोक्यावरची टोपी नीट केली आणि ते आपली निळी डायरी आणि पेन हुडकू लागले. ते घाईत होते.
“माझं नाव नारायण गायकवाड. मी कोल्हापुरातनं आलोय. तुम्ही कुठनं आलाय?” कोल्हापूरच्या जांभळीहून आलेले शेतकरी असणारे ७३ वर्षीय गायकवाड विचारतात.
दक्षिण मुंबईच्या आझाद मैदानात एका तंबूत सावलीला बसलेल्या अहमदनगर जिल्ह्यातनं आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या गटासोबत त्यांचं बोलणं सुरू होतं. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे राज्याच्या २१ जिल्ह्यातले शेतकरी २४-२६ जानेवारी दरम्यान मुंबईला आले होते. नारायणराव शिरोळ तालुक्यातल्या आपल्या गावाहून हात मोडलेला असतानाही ४०० किलोमीटर प्रवास करून आले होते.
आपली ओळख करून दिल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल ते सांगू लागले. “मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे मला हे मुद्दे समजतायत,” २५ जानेवारी रोजी त्यांनी मला सांगितलं होतं. ते आपल्या मोडलेल्या उजव्या हातानेच टिपणं घेत होतं. त्यामुळे वेदना होत असल्या तरी, ते म्हणतात, “शेतकरी आणि शेतमजुरांच्या समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी त्यांच्या समस्या ऐकून घेतोय.”
नंतर त्यांनी सांगितलं की आझाद मैदानात आलेल्या १० जिल्ह्यातल्या २० शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नारायण बापू (त्यांचं घरचं नाव, एरवी लोक त्यांना कॉम्रेड म्हणून ओळखतात) त्यांच्या शेतात काम करत होते तेव्हाच नारळाची झावळी त्यांच्या हातावर पडली आणि हाड मोडलं. ते ऊस आणि ज्वारी पिकवतात. रासायनिक खतांचा वापर न करता ते भाजीपाला देखील पिकवतात. सुरुवातीला त्यांनी दुखण्याकडे लक्ष दिलं नाही. पण आठवडा झाला तरी वेदना थांबल्या नाहीत म्हणून ते जांभळीतच एका खाजगी डॉक्टरकडे गेले. “डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की हात मुरगळला आहे. त्यांनी मला पट्टी [क्रेप बँडेज] बांधायला सांगितलं.”








