२०१७ साली उद्दांडरायुनिपालेम गावच्या गिंजुपल्ली शंकर राव या शेतकऱ्याने अमरावती या नव्याने वसत असलेल्या राजधानीतील त्यांना देण्यात आलेला ९००० चौ. फूट भूखंड विजयवाड्याच्या गिऱ्हाइकाला विकला. त्या व्यवहारात त्यांना २ कोटी रुपये मिळाले. त्यातले ८० लाख रुपये खर्च करून त्यांनी त्यांच्या ९० वर्षं जुन्या घराच्या जागी दोन मजली नवीन घर बांधलं. “मी आमच्या जुन्या घराचं बांधकाम करण्यासाठी तो पैसा वापरला, एक शेवरोले गाडी आणि मोटारसायकल घेतली आणि माझ्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं. तिच्या लग्नासाठी काही पैसा मागे टाकलाय,” ते खुशीत सांगतात.
गुंटुर जिल्ह्यातील, कृष्णेच्या उत्तरेकडच्या किनाऱ्यावरील २९ गावांच्या जागेवर आंध्र प्रदेशची ही नवी ‘ग्रीनफील्ड’ राजधानी, अमरावती वसवण्यात येत आहे. यातलं एक उद्दांडरायुनिपालेम. अमरावती शाश्वत राजधानी विकास प्रकल्पासाठी भू-एकत्रीकरण योजनेअंतर्गत फक्त पहिल्या टप्प्यासाठी ३३,००० एकरहून अधिक जमीन संपादित करण्यात येत आहे.
या २९ गावांमध्ये आता नवनव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, काही पूर्ण झाल्या आहेत तर काहींचं बांधकाम सुरू आहे. २०१४ साली राजधानीची घोषणा झाली आणि तेव्हापासून गावागावातून रियल इस्टेट एजन्सी सुरू झाल्या आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा झालाय तो वरच्या कम्मा जातीच्या जमीनदारांना. “जवळ जवळ ९० टक्के जमीनदारांनी, माझ्याप्रमाणेच, त्यांच्या [दिलेल्या] जमिनींचा काही हिस्सा विकलाय आणि घरं बांधलीयेत,” शंकर राव म्हणतात (शीर्षक छायाचित्रात उजवीकडे, सोबत त्यांचे शेजारी नरिना सुब्बा राव).









