कागदाचा एक कपटा उडत होता, वाऱ्याच्या झोताबरोबर… उद्ध्वस्त झालेल्या या भिंतीकडून त्या भिंतीकडे. ‘बेकायदेशीर’, ‘अतिक्रमण’ हे त्यावरचे शब्द जेमतेम दिसत होते. कागद पिवळा पडला होता ना! आणि ‘निष्कासन’ करण्याचे आदेश होते, त्यावर तर चिखलच माखला होता. देशाचा इतिहास चार भिंतीत राहतो का? दडपशाही, शौर्य आणि क्रांती यांच्या प्रतीकांसह तो तर हलक्या हवेवर विहरत पुसट सीमारेषांवरून दूरवर पोहोचतो.

रस्त्यावरच्या दगड-विटांच्या ढिगाऱ्याकडे तिने पाहिलं. तिच्या दुकानाचं आता उरलं होतं ते एवढंच. हे दुकानच रात्री तिचं घर व्हायचं. गेली सोळा वर्षं ती इथे दिवसभर चपला विकायची आणि संध्याकाळी शांतपणे बसून चहाचे घोट घ्यायची. तिचं हे फुटपाथवरचं सिंहासन आता उरलं होतं तेॲसबेस्टॉसचे तुकडे, सिमेंटच्या तुटलेल्या स्लॅब आणि वाकलेल्या लोखंडी सळ्या या रूपात… एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या थडग्यासारखं.

एके काळी इथे आणखी एक बेगम राहात होती. बेगम हजरत महल, अवधची राणी. आपलं ‘घर’ ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी ती शौर्याने लढली. मात्र भारतातल्या पहिल्या काही ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्ययोद्ध्यांपैकी एक असलेल्या या बेगमला नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला. बराच काळ ती विस्मृतीत गेली होती. तिचा वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु सीमेपलीकडे, काठमांडूला एक निराधार पत्थर तिची स्मृती जागवत राहिला.

भारतात बंडाची आणि बंडखोरांची अशी अनेक थडगी खोलवर गाडून टाकली गेली आहेत. पण अज्ञान, द्वेष यांचा त्यावरचा चिखल दूर करण्यासाठी बुलडोझरच नाहीत. विस्मृतीत गेलेल्या या बंडाच्या वळलेल्या मुठी उत्खनन करून काढण्यासाठी यंत्रंच नाहीत. कोणताही बुलडोझर आपला वासाहतिक इतिहास खोदून तिथे वंचितांचा आवाज पेरू शकणार नाही. कोणताही बुलडोझर अन्यायाच्या वाटेत उभा ठाकणार नाही… अजून तरी नाही.

कविता ऐका गोकुल जी. के. यांच्या आवाजात

सम्राटाचं कुत्रं

माझ्या शेजारणीच्या अंगणात
एक विचित्र जनावर अवतरलं
आपले पिवळे हात उंचावून
माकडउड्या मारत.
त्याची नखं आणि दात
रंगलेले रक्तमांसात
कालच्या भरपेट जेवणाच्या निशाण्या दाखवत.
जोरदार किंकाळी मारत, मान उंचावत
जनावर झेपावलं माझ्या शेजारणीच्या छातीवर.
शांतपणे बरगड्या तोडत हृदयापाशी पोहोचलं
गंजलेल्या हातांनी तिचं हृदय उपसलं
आणि दाखवत राहिलं, किती मी दुर्दम्य!
पण काहीतरी चुकलं की काय…?
माझ्या शेजारणीच्या छातीच्या खोबणीत
एक नवं हृदय उगवलं
गर्जना करत जनावराने तेही उपसलं
पण पुन्हा तिथेच दुसरं…
लालबुंद… धकधकणारं…
पुन्हापुन्हा असं होत राहिलं
जितकी उपसली, तितकीच उगवली
नवी हृदयं, नवी बीजं, नवी फुलं
नवं जीवन आणि
नवं जग.
माझ्या शेजारणीच्या अंगणात
एक विचित्र जनावर अवतरलं,
चोरलेली सगळी हृदयं दोन्ही हातांत धरून
मरून गेलं!

अनुवादः वैशाली रोडे

Poem and Text : Gokul G.K.

गोकुळ जी. के. चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी असून तो केरळमधील तिरुवनंतपुरमचा रहिवासी आहे.

यांचे इतर लिखाण Gokul G.K.
Illustration : Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

यांचे इतर लिखाण Labani Jangi
Translator : Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

यांचे इतर लिखाण Vaishali Rode