जात्यावरच्या ओव्या प्रकल्पातल्या या सात ओव्या नांदगावच्या कुसुम सोनवणे आणि शाहू कांबळेंनी गायल्या आहेत. आणि यात आहे बाया-बायांमधली कधी कच्ची तर कधी पक्की मैत्री
तुझा माझा गं भावपणा मी तर तोडिते तो गं तुटंना
अशी रेशमाचा गं दोरा गाठ पडली ना गं सुटंना
त्या नणंदा भावजया होत्या, पण त्यांची मैत्री लग्नाच्या सोयरिकीपेक्षा पक्की होती.
“आमच्या ओव्या सगळ्यांना खूप आवडायच्या. मुळशीच्या इतर गावांमधले लोक आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकरांवरची गाणी गायला आम्हाला बोलवायचे.” ७० वर्षीय कुसुमबाई सोनवणे सांगतात. ओव्या गाणारी त्यांची सोबतीण शाहूबाई कांबळे आणि त्यांच्या मैत्रीबद्दल त्या बोलतात. दोघी जणी उखळात एकत्र धान्य कांडायच्या आणि ते काम करत असतानाच नव्या चाली रचायच्या. मग जात्यावर ज्वारी किंवा तांदूळ दळताना या नव्या चालींवर नव्या ओव्या रचायच्या. सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नंदगाव मध्ये कुसुमताईंना आम्ही त्यांच्या घरी भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला या सगळ्या आठवणी सांगितल्या.
१९८० च्या दशकात जेव्हा गी पॉइटवँ आणि हेमा राइरकर यांचा गट महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये गेला तेव्हा कुसुमबाई आणि शाहूबाईंसारख्या बायांनी त्यांनी रचलेल्या ओव्या त्यांना दिल्या. यातल्याच काही जणी पुढे गरीब डोंगरी संघटनेच्या सदस्य झाल्या. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी भागातल्या गरिबांची ही संघटना आहे. गी बाबा आणि हेमाताई, संघटनेचे सदस्य प्रेमाने त्यांना असंच म्हणायचे – आता हे दोघंही हयात नाहीत. या दोघांनी गरीब डोंगरी संघटनेच्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीवजागृती केली, साक्षरतेचे वर्गही घेतले.
२५ मार्च २०१७ रोजी हेमा राईरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गरीब डोंगरी संघटनेचे काही सदस्य हेमाताईंच्या पुण्यातल्या बंगल्यावर त्यांच्या या दोन नेत्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जमले होते. त्यात मावळ तालुक्यातल्या मथाबाई भालसेन आणि बबाबाई लायगुडे व मुळशी तालुक्यातल्या कुसुमबाई सोनवणे आणि लीलाबाई कांबळे आल्या होत्या. या चौघी एकमेकींच्या सहाकारी आहेत आणि मैत्रिणीदेखील. त्या सांगतात, “आम्ही काही शाळा शिकलेलो नाही मात्र [गरीब डोंगरी संघटनेतल्या] कामाच्या अनुभवामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यामुळे आम्हाला ग्रामसभेत महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचं बळ आलंय.” बहुतेक वेळा पाण्याची टंचाई आणि टँकरची मागणी अशाच पद्धतीचे हे मुद्दे असतात.
फोटोसाठी त्यांना छानसं हसा असं सांगितल्यावर त्यांना भारीच गंमत वाटली.




