“आठवतंय की या ओव्या गायलेल्या, किती वर्षं झाली,” यंदा एप्रिलच्या शेवटी शेवटी फोनवर बोलताना मुक्ताबाई उभे म्हणाल्या. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या खडकवाडीच्या मुक्ताबाई उभेंनी १९९६ साली मूळच्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी या ओव्या गायल्या होत्या.
सध्याच्या कोविड-१९ महामारी आणि टाळेबंदीच्या काळात वीस वर्षांपूर्वी गायलेल्या या ओव्यांमधून भारतभरातल्या स्थलांतरितांचे, आपलं कुटुंब गावी सोडून दूर देशी गेलेल्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. या ओव्यांमधल्या दूरदेशी गेलेल्या धन्यासारखेच हे स्थलांतरित कामगारही गावाकडचं आपलं घर सोडून कोसो दूर कामाच्या शोधात शहरात येऊन पोचले होते.
१९८० च्या आधी, विजेवर, डिझेलवर चालणाऱ्या गिरण्या यायच्या आधी भारतातल्या गावोगावी बाया रोज जात्यावर दळणं करायच्या. दोघी-तिघी मिळून स्वयंपाकघरात, किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात, त्यांच्या स्वतःच्या खाजगी अशा जगात दळणं करताना ओव्या गायल्या जायच्या. इतरांच्या नजरा आणि समाजाची बंधनं विसरून त्या मुक्तपणे स्वतःच्या भावनांना वाट करून द्यायच्या. जात्याची घरघर आणि बांगड्यांची किणकिण या दोन्ही नादांच्या तालात साध्या, सरळ यमक जुळणाऱ्या या ओव्या रचल्या जायच्या.
मुक्ताबाईंचं लवकर वयातच लग्न झालं आणि सासूकडून त्या ओव्या शिकल्या. या ओव्यांमधून आपल्या धन्याबद्दल – कामासाठी दूरदेशी गेलेल्या या श्रमिकाबद्दल - वाटणारं प्रेम आणि आस व्यक्त होते. १९९६ मध्ये त्यांनी या ओव्या गायल्या तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या.
आता वयाची ६४ वर्षं पूर्ण केलेल्या मुक्ताबाई ओवीतल्या काही गोष्टींबद्दल दिलखुलास हसतात. पतीच्या डोळ्यातलं मोत्याचं पाणी आणि जवसाच्या फुलासारखी काया याविषयी मी त्यांच्याशी बोलत होते. “मी जवसाची फुलंच पाहिली नाहीत कधी,” मुक्ताबाई सांगतात, “पण या ओवीत ही सुवासिन तिच्या धन्याचं किती प्रेमानं कौतुक करते.”