हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यात सिंघु-दिल्ली सीमेवर जमलेला शेतकऱ्यांचा अथांग जत्था हरजीत सिंग पाहत बसलेत. हिवाळ्याचं धुरकट ऊन त्यांच्या चेहऱ्यावरून तरळून जातं.
सभोवताली, वयस्क आणि तरुण – पुरुष, स्त्रिया आणि लहानगी मुलंही – सगळे वेगवेगळ्या कामात मग्न आहेत. दोन पुरुष काठ्यांनी धोपटून गाद्यांमधली धूळ काढतायत, रात्रीची निजण्याची तयारी सुरू आहे. काही जण जाणाऱ्या येणाऱ्यांना चहा आणि बिस्किटं वाटतायत. अनेक जण त्यांच्या पुढाऱ्यांची भाषणं ऐकण्यासाठी मोठ्या जमावाच्या पुढे निघालेत. काहींची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. आणि बाकी निवांत इकडे तिकडे हिंडतायत.
या वर्षी सप्टेंबर महिन्यात संसदेत जे तीन कृषी कायदे रेटून मंजूर करून घेण्यात आले त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांपैकी एक म्हणजे हरजीत.
ते सांगतात की पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यातल्या माजरी सोधियाँ गावात आपल्या चार एकरात ते भात आणि गहू घ्यायचे. पन्नाशीचे हरजीत अविवाहित आहेत आणि आपल्या आईबरोबर राहतात.
२०१७ साली एक अपघात झाला आणि तेव्हापासून हरजीत चालू शकत नाहीयेत. पण आपल्या शेतकरी बांधवांबरोबर या प्रचंड मोठ्या निदर्शनांना येण्यापासून त्यांना कुणी रोकू शकलं नाही. “मी माझ्या घराच्या छतावर काम करत होतो आणि तिथून खाली पडलो,” अपघाताबद्दल ते सांगतात. “खुब्याचं हाड मोडलं.”





