यंदा हिवाळा चांगलाच कडक असल्यामुळे अब्दुल माजीद वनी खूश आहेत. जास्तीत जास्त लोकांना कांगरी हवी असणार अशी त्यांना आशा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काश्मीरच्या काही भागात तापमान -१० अंशाखाली गेलं होतं.
५५ वर्षीय वनी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात चरार-इ-शरीफमध्ये राहतात आणि तिथेच काम करतात. श्रीनगरहून ३२ किलोमीटर दूर असणाऱ्या या गावात कांगरी बनवणारे अनेक कारागीर आहेत. फुललेले निखारे ठेवण्यासाठीचं मातीचं मडकं वेताच्या टोपलीत ठेवतात, त्याला म्हणतात कांगरी. काश्मीरमध्ये अनेक जण या टोपलीची कडी हातात धरून फिरनच्या (गुडघ्यापर्यंत येणारा लोकरीचा अंगरखा) आत कांगरी ठेवतात. कांगरीतले फुललेले निखारे काश्मीरच्या गोठवणाऱ्या लांबलचक हिवाळ्यांमध्ये ऊब देतात. (काही अभ्यासांमध्ये फक्त काश्मीरमध्ये आढळणाऱ्या ‘कांगरी-कॅन्सर’चा उल्लेख आढळतो. दीर्घ काळ निखारे त्वचेच्या जवळ धरल्यामुळे होणारा हा विशिष्ट स्वरुपाचा कॅन्सर आहे. पण त्याविषयी परत कधी तरी.)
“आम्ही वेताच्या सुंदर कांगऱ्या बनवतो, त्यासाठी आमचा हा भाग प्रसिद्ध आहे,” चरार-इ-शरीफच्या कानिल मोहल्ल्यात राहणारा ३० वर्षीय उमर हसन दार म्हणतो. इथले कारागीर आणि कामगार कांगरी बनवण्याच्या उद्योगात आहेत. विलो म्हणजेच वाळुंजीचं लाकूड जवळपासच्या जंगलांमधून मिळतं आणि त्याच्या फांद्या काढून त्यापासून टोपल्या विणल्या जातात. कधी कधी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन हे लाकूड उकळून मऊ करतात, त्याची साल तासून काढून टाकतात. यासाठी हातानंच तयार केलेल्या एका अवजाराचा वापर होतो (याला छाप्पून म्हणतात. लाकडाचे दोन दांडके काटकोनात बसवून जमिनीत घट्ट रोवलेले असतात) आणि मग हे फोक भिजवून, सुकवून नंतर रंगवले जातात. त्यानंतर या वेताच्या टोपल्या विणल्या जातात.
या सगळ्याला एक आठवड्याचा काळ लागतो, कारण या काड्या पूर्ण वाळाव्या लागतात. हिवाळा सुरू होण्याआधी ऑगस्ट महिन्यात शक्यतो कांगऱ्या विणायला सुरुवात होते. आणि कधी कधी मागणी असेल त्याप्रमाणे अगदी हिवाळा सुरू असतानाही कांगऱ्या विणल्या जातात. फेब्रुवारी संपेपर्यंत हिवाळा उतरतो.
पूर्वी कांगऱ्या म्हणजे फक्त मातीची मडकी असायची, त्याभोवती टोपली नसायची. गावातल्याच कुंभारांकडून ही मडकी विकत घेतली जायची. पण कालांतराने काही कारागिरांनी मडक्यांभोवती विविध प्रकारच्या टोपल्या विणायला सुरुवात केली, यांची किंमत जुन्या कांगऱ्यांपेक्षा जास्त असते. स्वस्त कांगरी घ्यायची तर आता १५० रुपये पडतात आणि ती विणण्यासाठी ३-४ तास लागतात, नाजूक नक्षीकाम असणारी रंगी-बेरंगी कांगरी – जी विणण्यासाठी ३-४ दिवस लागू शकतात – घ्यायची तर अगदी १८०० रुपयांपर्यंत किंमत जाऊ शकते, उमर मला सांगतो. त्यात त्याला १००० ते १२०० रुपयांपर्यंत नफा मिळतो.














