जयश्री म्हात्रे घारापुरीत आपल्या घराजवळच्या जंगलात लाकूडफाटा गोळा करायला गेल्या होत्या. अचानक त्यांना काही तरी चावलं. ४३ वर्षांच्या जयश्रींनी फार काही लक्ष दिलं नाही. त्यांना वाटलं काही तरी टोचलं असेल म्हणून. थोड्या वेळाने लाकडं गोळा करून त्या घरी परतल्या. २०२० च्या जानेवारीतली ही गोष्ट. दुपारची वेळ होती. हवेत गारवा होता.
त्यानंतर थोडाच वेळ उलटला असेल, आपल्या घराच्या उंबऱ्यात उभं राहून जयश्री कुणाशी तरी बोलत होत्या आणि अचानक चक्कर येऊन त्या जमिनीवर पडल्या. आजूबाजूच्या लोकांना वाटलं की उपास चालू होते, त्यातून अशक्तपणा आला असणार आणि म्हणून त्या पडल्या.
“मला त्यांनी सांगितलं की ती बेशुद्ध पडलीये,” जयश्रींची थोरली मुलगी, २० वर्षांची भाविका सांगते. ती आणि तिची धाकटी बहीण, १४ वर्षांची गौरी दोघीही नातेवाइकाकडे गेल्याने हा प्रसंग घडला तेव्हा तिथे नव्हत्या. जयश्रींसोबत असणाऱ्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाइकांकडून त्यांना समजलं. काही काळाने जयश्री शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांचा हात कापत होता. “काय झालं ते कुणालाच कळत नव्हतं,” भाविका सांगते.
कुणी तरी धावतच जयश्रींचे पती मधुकर म्हात्रेंना झाला प्रसंग सांगायला गेलं. ५३ वर्षीय म्हात्रे घारापुरी बेटांवर खाद्यपदार्थांचं दुकान चालवतात. ते दुकानात होते. अरबी समुद्रातलं हे बेट इथल्या एलिफंटा किंवा घारापुरीच्या लेणींसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई शहराच्या जवळ असणारी ६ व्या ते ७ व्या शतकादरम्यान कोरलेली ही लेणी युनेस्कोने वारसा स्थळ म्हणून जाहीर केली आहेत. दर वर्षी लाखो लोक या लेणींना भेट देतात. बेटावरच्या रहिवाशांना पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा आधार आहे. टोप्या, गॉगल, आठवण म्हणून नेण्यासाठी काही वस्तू आणि खायचे पदार्थ विकून लोक चार पैसे कमवतात. काही जण लेणी पहायला येणाऱ्यांसाठी गाइड म्हणून काम करतात.
पर्यटनस्थळांच्या नकाशावर घारापुरी बेटांना महत्त्वाचं स्थान असलं तरी बेटावरचं घारापुरी गाव मात्र आजही सरकारी आरोग्य सुविधेच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्षांपूर्वी एक दवाखाना बांधण्यात आला पण आज तो तसाच धूळ खात पडला आहे. बेटाच्या राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदर या तीन पाड्यांवर मिळून १,१०० लोकसंख्या आहे. बेटावर आरोग्यसुविधाच नसल्याने इथल्या रहिवाशांना काहीही झालं तरी बोटीने प्रवास करून जावं लागतं. फक्त खर्च वाढतो हा मुद्दा नसून अनेकांना आरोग्यसुविधा विलंबाने मिळाल्याने जिवावरही बेतल्याची उदाहरणं कमी नाहीत.














