संदीपान वाळवेंना आता अशा विनंतीत काही वावगं वाटेनासं झालं आहे. “सरणाला अग्नी देण्याआधी अंगावर ही नेसवा तेवढी,” मृत स्त्रीच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं आणि एक गर्द हिरवी साडी त्यांच्या हाती सोपवली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ते केलंही.
महाराष्ट्राच्या उस्मानाबाद शहरातल्या स्मशानभूमीमध्ये १५ मृतदेह रांगेत ठेवलेले होते. वाळवेंना सांगितलेला देह त्यांनी शोधला. पीपीई किट घालून त्यांनी हवाबंद बॉडीबॅगवरती हातमोजे घालून होईल तितक्या नीट हिरवी साडी नेसवली. “आपल्यालाही लागण होईल अशी त्यांच्या नातेवाइकांना भीती वाटत होती,” ते सांगतात.
उस्मानाबाद नगरपरिषदेमध्ये कर्मचारी असलेले ४५ वर्षीय वाळवे मार्च २०२० मध्ये जेव्हा या महासाथीला सुरुवात झाली तेव्हापासून मृतदेहांचं दहन करत आहेत. तेव्हापासून त्यांनी किमान १०० जणांवर अंत्यसंस्कार केले असतील. ग्रामीण भागात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने जोरदार शिरकाव केला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीपासून दिवसाला १५-२० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत येत आहेत. त्यामुळे वाळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय आणि लोकांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.
“या विषाणूच्या भीतीमुळे नातेवाईक अंत्यसंस्काराला यायचं देखील टाळायला लागलेत,” वाळवे सांगतात. “त्यामुळे चितेला अग्नी देण्याआधी ते आम्हाला मृत व्यक्तीवर काही साधे संस्कार करायला सांगतात. काळच वाईट आहे. आजूबाजूला आपली माणसं नसताना चिता पेटतायत ते पाहून काळजाला भोकं पडतात. एकच बरंय गेलेल्यांना पत्ताच नाही त्यांना शेवटची निरोप कसा दिलाय ते.”









