सुनील गुप्ता काही घरून काम करू शकत नाहीत. आणि त्यांचं ‘ऑफिस’, अर्थात गेटवे ऑफ इंडिया, गेले १५ महिने, बराच काळ बंद आहे.
“आमच्यासाठी हे 'दफ्तर' आहे. आम्ही कुठे जाणार?” दक्षिण मुंबईतल्या या स्मारकाकडे बोट दाखवत ते विचारतात.
टाळेबंदी लागली त्या आधी आपला कॅमेरा घेऊन सकाळी ९ ते रात्री ९ सुनील या लोकप्रिय पर्यटनस्थळी थांबलेले असायचे. गेटवेकडे जाणारे विविध चेकपॉइंट पार करून जाणाऱ्या पर्यटकांना गाठून ते आणि त्यांच्यासारखे इतर छायाचित्रकार आपल्याकडचे क्लिक आणि प्रिंट असे ‘इन्स्टंट’ फोटोंचे अल्बम त्यांच्या पुढ्यात धरायचे आणि ‘एक मिनिट में फुल फॅमिली फोटो’ किंवा ‘एक फोटो प्लीज. फक्त ३० रुपये’ अशी गळ घालायचे.
कोविड-१९ च्या केसेस वाढायला लागल्या आणि एप्रिलच्या मध्यावर मुंबईमध्ये परत एकदा निर्बंध लागू झाले. परत एकदा काम बंद झालं. “आज सकाळी मी इथे आलो तर माझं स्वागत या ‘नो एन्ट्री’ ने केलं,” एप्रिल महिन्यात ३९ वर्षीय सुनील मला म्हणाले होते. “आधीच कमाईचे वांदे झाले होते आता तर निगेटिव्हच झालंय म्हणा ना. आणखी तोटा सहन करायचं त्राण काही माझ्यात राहिलेलं नाही.”


















