या वर्षी मे महिन्याच्या तलखीत, गोट्टम हनिमी रेड्डी नुझेन्डला मंडलमधल्या त्रिपुरपुरम गावाहून १०५ किमी प्रवास करून गुंटूरला आले होते. आपल्या पाच एकर रानातली आठ क्विंटल मिरची इथे विकली जाईल अशी त्यांना आशा होती. हा शेवटचा बहार होता. ते एप्रिलमध्ये तीनदा बाजारात येऊन गेले होते आणि त्यांनी LCA 334 किंवा गुंटूर सन्नम जातीची मिरची वाणाप्रमाणे ६,००० ते ८,००० रुपये प्रति क्विंटल दराने विकली होती.
आता ते पुन्हा एकदा आंध्र प्रदेशाच्या गुंटूरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पोचलेत. भाव वाढतील या आशेने आपला मिरचीचा ट्रक घेऊन ते तीन दिवस वाट पाहत थांबलेत. २०१७-१८ च्या शेतीच्या हंगामातला खरेदी विक्रीच्या व्यवहारांचा आजचा शेवटचा दिवस. बाजारातल्या शेतकऱ्यांच्या खानावळीबाहेर बसलेले रेड्डी सांगतात, “आज भाव आणखी कोसळलेत आणि आता तर हे दलाल क्विंटलमागे फक्त ४,२०० रुपये भाव देतायत. ते सगळे जण एकमेकांशी संगनमत करतात आणि त्यांच्या मनाला येईल तसे भाव ठरवतात.”
अशी कोंडी झाल्यावर रेड्डींना आता निर्णय घ्यायला लागणार, एक तर सगळा माल घरी परत न्यायचा आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचा किंवा कमी किंमतीत माल विकायचा. “मला काही वातानुकुलित यंत्रणा परवडत नाही आणि एका क्विंटलमागे [दोन ५० किलोच्या गोण्या] एका वेळचा वाहतूक खर्च १००० रुपये येतो,” कमी भावात मिरची विकायचं कारण रेड्डी सांगतात. ते क्षणभर थांबतात आणि दबक्या आवाजात सांगतात, “हे दलाल आणि त्या एसीवाल्यांचं [कोल्ड स्टोरेज पुरवठादार] साटंलोटं सगळ्यांनाच माहितीये. काहीही करा, दोघांचाही फायदाच आहे.”
रेड्डींनी बी, खतं, कीटकनाशकं आणि मजुरीवर एकरी २ लाख तरी खर्च केले आहेत. त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे श्रम वेगळेच. २०१७-१८ च्या ऑक्टोबर ते मार्चच्या हंगामात त्यांची एकरी २० क्विंटल मिरची निघाली. म्हणजे सुमारे १०० क्विंटलमागे एकूण १० लाख खर्च आला. आधीच्या हंगामांमध्ये हेही ठीक होतं कारण भाव बराच चांगला – २०१५-१६ मध्ये १२,००० ते १५,००० रुपये प्रति क्विंटल असा मिळत होता (कदाचित आंतरराष्ट्रीय बाजारात मिरचीची मागणी वाढल्याने असेल), आणि इतर वर्षीदेखील किमान १०,००० रुपये प्रति क्विंटल. मिरची शेतकऱ्याचा खर्च यातनं निघत होता.








