एकावन्न वर्षाच्या लालमती देवीच्या लग्नाला ३० वर्षे झाली, चार मुलं झाली, तरीही चांगल्या आरोग्याची हमी मात्र तिच्याकडे नाही नाही. ती सरन जिल्हयातील पारसा तालुक्यातील भेल्डी गावात राहते. सहा महिन्यापासून तिला वारंवार ताप येतोय. तिचा नवरा राजदेव रे त्याच्या कामात मग्न आहे (तो कोणत्या प्रकारचे काम करतो हे तो सांगू शकला नाही) त्यामुळे तो तिला डॉक्टरकडे नेवू शकत नाही. ती गावातीलच वैदू आणि झोला छाप डॉक्टरांचा सल्ला घेते.
खूप खोदून विचारल्यावर ती सांगते,“कोणी म्हणते की ती एक अलर्जी आहे, ती आपोआपच निघून जाईल. हा रोग आधी माझ्या चेहऱ्यावर पसरला, मग माझ्या पायावर आणि पोटावर पसरला. लोक माझ्या दुःखावर हसतात.” लालमतीच्या कुटुंबाला या काला आजाराची आधीपासून माहिती होती, कारण चार वर्षापूर्वी तिच्या लहान मुलाला हा आजार झाला होता. “मी त्याला डॉक्टरकडे घेवून गेलो होतो, आता तो बरा झालाय,” लालमतीचे पती राजदेव मोठ्या अभिमानाने सांगतात. आता त्याच्या बायकोच्या आजाराचं निदान झालंय, पण तिला उपचारांनी खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिने ते अर्ध्यावरच सोडले, पण त्याला त्याच्याशी फार काही देणंघेणं नाही. तो खांदे उडवत म्हणतो की, “ते अस्वस्थ वाटणं वगैरे सगळं सवयीचं होईल आणि मग ती घेईल औषध.” खूप काळ चालणाऱ्या, शारीरिक अस्वस्थता आणणाऱ्या PKDL च्या उपचारांदरम्यान कुटुंबाचे सहाय्य,आधार याची रुग्णाला गरज असते, याचं त्याला अजिबातच भान नव्हतं.
बिहारने २०२० पर्यंत काला आजाराचं निर्मूलनकरायचं ठरवलं आहे. DNDi च्या भारताच्या संचालक सुमन रिजल म्हणतात की, “स्त्रिया आणि मुलांपर्यंत पोचण्यावर विशेष भर दिला जाणार असून त्यामुळे हा आजार कमी होण्यास नक्की मदत होईल.” जर बिहारला आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात केला जाणारा भेदभाव, त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष आणि अनास्था या विरुद्धची ही लढाई आहे, ती एकट्या स्त्रियांच्या खांद्यावर टाकून चालणार नाही.
अनुवादः अश्विनी बर्वे