यशोदाबाई जोरवर सायंकाळी डुकरं पांगवत आपला वेळ काढतात. “मगं, ती सरळ रानात घुसून वाट लावतात,” त्या सांगतात. “खरं तर या जमिनीचा आम्हाला काय बी फायदा नाही. पण माझा येळ जातो गुमान.”
सत्तरी पार केलेल्या यशोदाबाई महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या हटकरवाडीत गेल्या काही महिन्यापासून घरी एकट्यानेच राहतायत. “माझे दोन ल्योक आन् सुना तिथं बारामतीत [इथून १५० किलोमीटरवर, पश्चिम महाराष्ट्रात] हायता, त्यांची पाचं लेकरं बी संगट हायेत,” त्या सांगतात. “दिवाळी झाली की त्यांनी गाव सोडलं आन् आता पाडव्यापातुर येतील माघारी.”
दर वर्षी मराठवाड्यातले, खास करून बीड जिल्ह्यातले शेतकरी हंगामी स्थलांतर करून ऊसतोडीला जातात कारण त्यांच्या शेतीतून घर चालण्याइतकंही उत्पन्न निघत नाही. तोडीवर त्यांना तोडलेल्या उसाच्या टनामागे २२८ रुपये किंवा पाच महिन्यांमध्ये मिळून ६०,००० रुपये मिळतात. अनेक कुटुंबांसाठी तर दर वर्षातलं केवळ हेच काय ते नियमित उत्पन्न आहे.
“आमच्या दोन एकर रानातून वर्षाला दहा हजाराचं बी उत्पन्न निघत नसेल,” चष्म्याआडून यशोदाबाई सांगतात. “भर शेतीत काम असलं तरी आमचं पोट मजुरीवरच अवलंबून आहे. आता या डोंगराळ भागात पाणी तरी हाय का?” वर्षातले ६-७ महिने त्यांची मुलं कुटुंबासह हटकरवाडीत असतात, त्या काळात घरी खाण्यापुरतं ज्वारी, बाजरी आणि तुरीचं पीक घेतात. यशोदाबाई एकट्या असतात तेव्हा या धान्यावरच त्यांचं निभतं.









