उमा पाटलांच्या दोन खोल्यांच्या घरात कोपऱ्यातल्या कपाटाचा एक कप्पा गेल्या दहा वर्षांतल्या हाती लिहिलेल्या दस्ताने भरलाय – मोठाल्या खतावण्या, बारक्या वह्या, रोजनिश्या आणि सर्वेक्षण फॉर्म्सच्या प्रती. जाड प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे सगळं रचून ठेवलंय.
या अखंड वाढत जाणाऱ्या कागदपत्रांच्या चळतींमध्ये खरं तर ग्रामीण महाराष्ट्राचं आरोग्यच या आशांनी (ASHA - Accredited Social Health Activists) नोंदवून ठेवलंय – बालजन्म, लसीकरण, किशोरवयीनांचं पोषण, गर्भनिरोधन, क्षयरोग आणि बरंच काही. उमा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या अरग गावच्या लोकांसाठी या सगळ्या नोंदी २००९ पासून ठेवत आल्या आहेत. आणि त्याच सोबत आपल्या गावातल्या लोकांना सातत्याने आरोग्याच्या प्रश्नांवर मार्गदर्शनही चालूच आहे.
४५ वर्षीय उमांप्रमाणेच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये ५५,००० आशा कार्यकर्त्या दिवसाचे अनेक तास राबून आपल्या गावात प्राथमिक आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याचं काम करतायत. २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ही कार्यकर्त्यांची फळी सुरू करण्यात आली. एकूण २३ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर या सामुदायिक आरोग्य कार्यकर्त्यांची – सर्व महिलांची – नेमणूक करण्यात येते. ग्रामीण आरोग्य अभियानाच्या निकषांनुसार आदिवासी पाड्यांसाठी दर १००० लोकसंख्येसाठी एक आशा (किमान आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण) तर बिगर आदिवासी गावांसाठी दर १५०० लोकसंख्येसाठी एक आशा (किमान १०वी पास) नेमण्यात येते.
तब्बल १५,६०० लोकसंख्या असणाऱ्या अरगमध्ये उमा यांच्यासोबत इतर १५ आशा कार्यकर्त्या सकाळी १० वाजताच कामासाठी घर सोडतात. अरगमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे जे मिरज तालुक्यातल्या बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी आणि लक्ष्मीवाडी गावांना आरोग्यसेवा पुरवतं. या केंद्राअंतर्गत एकूण ४१ आशा जवळपास ४७,००० लोकसंख्येसाठी काम करतात.
प्रत्येक आशा कार्यकर्ती तिला नेमून देण्यात आलेल्या प्रत्येक घरी भेट देते आणि दर दिवशी अपेक्षित पाच तासांपेक्षा बराच जास्त वेळ खर्च करते. “घरं जर गावातच असली तर १०-१५ गृहभेटी दोन तासांमध्ये करता येतात. मात्र काही जण वेशीपाशी किंवा मळ्यात राहतात. मग मात्र अगदी चार भेटी द्यायला पण पाच तासांहून जास्त वेळ जातो. आम्हाला झाडोऱ्यातून, रानानी, पांदीच्या वाटा पायी तुडवाव्या लागतात. पावसाळ्यात तर फारच बेकार हालत असते,” उमा सांगतात.















