गोपीनाथ नायकवडी मुंबईला जायचंच असा निर्धार करून नाशिकला आले. “आम्ही वर्षभर वाट पाहिली, पण सरकारने आमची एक पण मागणी मान्य केली नाहीये. या बारीला जोवर सरकार आमच्या सगळ्या मागण्या लागू करत नाही तोवर आम्ही परतणार नाही,” अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या तांभोळ गावचे ८८ वर्षांचे शेतकरी असणारे नायकवडी सांगतात.
नायकवडी चार एकर जमीन कसायचे, त्यातली एक एकर त्यांच्या मालकीची आहे तर बाकी वनखात्याच्या मालकीची. पण गेल्या वर्षीपासून ते केवळ त्यांच्या मालकीच्या एकरातच शेती करतायत. “गावात प्यायला पाणी नाही. शेती कशी करावी?” ते मला विचारतात. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली आणि महामार्ग बस स्टँडपासून १० किलोमीटरवर, तीन तास चालल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या विल्होळी गावी हजारो मोर्चेकरी जेवणासाठी थांबले. तेही अकोले तालुक्यातल्या २५० शेतकऱ्यांसोबत चालत इथवर आले होते.



