दररोज सकाळी, अरिफ (डावीकडे) आणि शेरू (गाढव) मांडव्याच्या गल्लीबोळात फिरून फळं आणि भाज्या विकतात. कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, केळी आणि इतरही बराच भाजीपाला लादलेली गाडी शेरू ओढतो आणि याआधी बांधकाम कामगार असलेले ४० वर्षीय अरिफ मोहम्मद आणि त्यांचा मदतनीस (ज्यांनी नाव सांगायला नकार दिला) दोघं राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यातल्या या गावात नेहमीच्या आणि नव्या गिऱ्हाइकांशी घासाघीस करतात. आठ एक तास थोडाफार भाजीपाला विकून झाला की संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते थांबतात. तोवर अरिफ सांगतात, ३००-४०० रुपयांची कमाई झालेली असते. एवढं बोलून ते घाईघाईने पुढे निघतात. ऐन धंद्याची वेळ आहे आणि शेरू देखील चुळबुळ करतोय.
कधी काळी राजस्थानात, खास करून बारमेर, बिकानेर, चुरू आणि जैसलमेर जिल्ह्यात असे असंख्य शेरू होते. आणि अगदी आजही, भारतातल्या दर पाचातलं एक गाढव याच राज्यात आहे. पण २० व्या पशुधन जनगणनेचे (२०१९) आकडे सांगतात की गाढवांची संख्या झपाट्याने खालावत चालली आहे. भारतभरात, त्यांचा आकडा २०१२ च्या जनगणनेत ३,३०,००० वरून २०१९ च्या जनगणनेत १,२०,००० असा, ६२ टक्क्यांनी घटला आहे. राजस्थानात तर ही घसरण जवळ जवळ ७२ टक्के – ८१,००० वरून २३,००० इतकी झालीये.



