आम्हाला उशीर झाला होता. “गणपती बाळा यादव तुम्ही आलात का नाही ते पहायला दोनदा त्यांच्या गावाहून चकरा मारून गेलेत,” शिरगावचे आमचे पत्रकार मित्र संपत मोरे सांगत होते. दोन्ही वेळा ते त्यांच्या गावी रामापूरला परत गेले. आता तुम्ही आला आहात असं त्यांना सांगू तेव्हा ते तिसऱ्या खेपेला इथे येतील. या दोन्ही गावात ५ किलोमीटरचं अंतर आहे आणि गणपती यादव हे अंतर सायकलने कापतात. आणि मे महिन्याच्या उन्हाच्या कारात अशा तीन खेपा म्हणजे ३० किलोमीटर, तेही डर्ट ट्रॅकला लाजवेल अशा ‘रस्त्या’वर, सायकल किमान पाव शतकापूर्वीची. आणि सायकलस्वाराचं वय, ९७ वर्षे.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या शिरगावात मोरेंच्या आजोबांच्या घरी आम्ही जेवायला बसतच होतो तितक्यात गणपती बाळा यादव निवांत त्यांच्या सायकलवर तिथे पोचले. इतक्या उन्हाचं त्यांना एवढं अंतर कापत इथे यायला लागलं म्हणून मी त्यांची पुन्हापुन्हा माफी मागत होतो हे पाहून ते कोड्यातच पडले. “त्यात काय एवढं,” त्यांच्या मऊ आवाजात, हलकं हसत ते म्हणाले. “काल दुपारच्याला मी एक लगीन होतं तर हितनं विट्याला गेलतो, तिथं बी सायकलनंच. मी सायकलवरच जात असतो सगळीकडे.” रामापूरहून विट्याला जाऊन यायचं म्हणजे ४० किलोमीटर. अन् आदल्या दिवशी ऊन जरा जास्तच होतं, ४०-४५ डिग्री तर नक्कीच.
“एक दोन वर्षांखाली पंढरपूरला जाऊन आले होते ते, जवळ जवळ १५० किलोमीटर,” संपत मोरे सांगतात. “आता मात्र ते तेवढी सायकल चालवत नाहीत.”







